“ज्येष्ठ समाजवादी नेते वसईचे माजी आम. प्रा. स. गो. वर्टी सरांच्या जंयती निमित्ताने स.गो.वर्टी फाउंडेशन आयोजित व्याख्यानसभेत संजय आवटे यांनी “आजची सामाजिक व राजकीय स्थिती” या विषयावर सध्याच्या राजकीय व सामाजिक स्थितीवर आपले चौफेर विचार मांडले”!
वसई :-
भारत हा देश कोणत्या एका पक्षाचा, जातीचा, धर्माचा नाही तर तेथे राहणाऱ्या सर्व नागरिकांचा आहे, सर्वांना संविधानाने दिलेल्या अधिकारातून बोलण्याचा व व्यक्त होण्याचा हक्क आहे.
देशात व राज्यात सत्ता कोणत्याही पक्षाची येवो किंवा जावो पण सामान्य जनतेची सत्ता मात्र कधीच जाता कामा नये असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार व पुणे लोकमत दैनिकाचे संपादक संजय आवटे यांनी वसई येथे व्यक्त केले.

ज्येष्ठ समाजवादी नेते वसईचे माजी आमदार प्रा. स गो. वर्टी सरांच्या जंयती निमित्ताने दि १ जून २०२५ रोजी स.गो.वर्टी फाउंडेशन आयोजित व्याख्यानसभेत संजय आवटे यांनीं “आजची सामाजिक व राजकीय स्थिती” या विषयावर न्यू इंग्लिश स्कूल,वसई येथे त्यांनी सध्याच्या राजकीय व सामाजिक स्थितीवर आपले चौफेर विचार मांडले.

भारत देशाला सध्या युद्धाची नाही तर गांधीं व बुद्धाच्या विचाराची गरज आहे. जाती व धर्माच्या मुद्द्यावर खोटे नेरेटिव्ह पसरविले जात आहेत. मन की बात करत असताना संविधानाचीही बात ही झाली पाहिजे,धर्माच्या संकल्पनेवर देश टिकत नाही हे पाकिस्तान व अफगाणिस्तानातील देशाच्या परिस्थितीने सिद्ध झाले आहे.
सध्या आपल्या देशात संविधानाची पायमल्ली संविधानिक मार्गानेच सुरू आहे. म्हणून आपल्या देशाला सांस्कृतिक राजकारणाची गरज आहे. ही गरज राष्ट्रसेवा दल व समाजवादी परिवार जनसंघटनाने भरून काढावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्टीसर फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्री सामंत यांनी केले. तर यावेळी वर्टीसराच्या कार्याचा गौरव करून वर्टीसर व त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी हे फाऊंडेशन नेहमी कार्यरत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. त्याचप्रमाणे आजपर्यंत ट्रस्टने केलेल्या सत्कार आणि पुरस्कार दिलेल्या व्यक्तींचा उल्लेख ही केला.
दरम्यान या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्र सेवा दल सैनिकांनी, राष्ट्रसेवा दल प्रार्थना गीताने झाली याप्रसंगी पाहुण्यांची ओळख व स्वागत कुमार राऊत यांनी करून दिली तर सूत्रसंचलन केलीस ब्रास आणि शेवटी उपस्थितीतांचे आभार पायस मच्याडो ह्यांनी मानले.

या कार्यक्रमाला वसईतील जेष्ट साहित्यिका प्रा. डॉ सिसिलिया करवालो, अशोक कुलास, शोभा बागुल, जॉन परेरा, जगदीश राऊत,आशय राऊत व विविध पक्ष, संघटना व संस्थांचे मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
