“पालघर जिल्ह्यातील अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तासाठी २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर”
पालघर,दि. ७ : –
अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील घरे ,शेती फळशेती, मत्स्य उत्पादने, पशु इत्यादीचे नुकसान झाल्यामुळे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नुकसान ग्रस्तासाठी निधीची आग्रही मागणी करून रु.२ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असल्याची माहिती पालघर जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे.
पालघर जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यांमुळे एप्रिल आणि मे २०२५ महिन्यांत मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली. ४ ते ६ एप्रिल, ६ व ७ मे आणि २३ ते २५ मे २०२५ या कालावधीमध्ये जिल्ह्यात एकूण ३८ घरे पूर्णतः तर ३ हजार ८५२ घरे अंशतः बाधित झाली आहेत. याशिवाय १० झोपड्या पूर्णतः नष्ट झाल्या असून ६ गोठ्यांचेही नुकसान झाले आहे.
या आपत्तीग्रस्तांसाठी शासनाच्या महसूल व वन विभागाकडून रु. २ कोटी ५० लाख ६३ हजार ९२५ इतक्या निधीची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात दि. २ जून २०२५ रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक ही झाली होती.
या बैठकीत प्रस्तावाची सविस्तर माहिती घेऊन पालकमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा मांडला आणि मुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ निधी वितरित करण्याचे निर्देश दिले.
यानुसार विभागीय आयुक्त, कोकण विभाग, नवी मुंबई यांचेमार्फत रु.२ कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून तो संबंधित तहसिलदारांमार्फत बाधितांना वितरित करण्याचे काम सुरू आहे.
या आपत्तीमुळे जिल्ह्यातील अनेक कुटुंबे उघड्यावर आली असून, शासनाकडून मिळणारी ही आर्थिक मदत त्यांच्या पुनर्वसनासाठी दिलासादायक ठरणार आहे असे जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले.

या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे दि. ४ व ५ एप्रिल २०२५ रोजी पूर्णतः नष्ट झालेली घरे १, अंशत: नुकसान झालेली घरे-३३९, नष्ट झालेल्या झोपड्या १, नुकसान झालेले गोठे- ३ एकूण निधी रु. १८ लाख ९४ हजार २३० आणि दि. ६ ते ८ मे, २०२५ पूर्णतः नष्ट झालेली घरे ३ , अंशत: नुकसान झालेली घरे-२१२०, नष्ट झालेल्या झोपड्या-४ , एकूण निधी रु. १ कोटी २० लाख १५ हजार १९५ ,
तसेच दि. २३ ते २५ मे, २०२५ रोजी पूर्णतः नष्ट झालेली घरे ३४, अंशत: नुकसान झालेली घरे- १३९३, नष्ट झालेल्या झोपड्या-५ , नुकसान झालेले गोठे-३ एकूण निधी रु. १ कोटी ११ लाख ५४ हजार ५०० असा आहे.
जिल्ह्यात नुकसान झालेल्या कालावधी एकूण पूर्णत: नष्ट झालेली घरे ३८, अंशत: नुकसान झालेली घरे ३८५२, नष्ट झालेला झोपड्या १०, नुकसान झालेले गोठे ६ यासाठी आवश्यक निधी २ कोटी ५० लाख ६३ हजार ९२५ रुपये इतका आहे.
—-
![]()
