वसईतील नायगाव–पापडी पुलाला तडे गेल्यानंतर येथे सातत्याने सुरु असलेल्या डंपर वाहतुकीमुळे गंभीर धोका निर्माण झाला आहें तर येथील जड वाहतुकीने नागरिक भयभीत झाले आहेत.

वसई :- विशेष बातमीदार
नायगाव स्टेशन परिसरात सुरू असलेल्या नवीन रेल्वे पुलाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात माती भराव सुरू असून या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या जड डंपर गाडयांची दिवसरात्र सुरू असलेली वाहतूक नायगाव कोळीवाड्यातील घरांना भूकंपासारखे तीव्र कंप देत आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे नायगाव ते वसई कोळीवाडा जोडणारा एकमेव नायगाव खाडी पुल. या पुलाला स्पष्ट तडे गेलेले आहेत आणि पुलाची स्थिती अत्यंत बिकट आहे.
अशा परिस्थितीत जड डंपरांची सततची ये-जा सुरू असल्याने पूल पडण्याची शक्यता अधिकच वाढली आहे. हा पूल तुटल्यास नायगाव स्टेशन ते वसई कोळीवाडा यांतील संपर्क पूर्णपणे तुटेल आणि हजारो प्रवाशांचे हाल होणार आहेत.
या मार्गावर अनेक शाळा, मंदिरे, पाली चर्च तसेच नायगावचे होलसेल मासळी मार्केट आहे. या भागात नेहमीच मोठी गर्दी असते. अशा परिस्थितीत जड डंपरांची वाहतूक अपघातांची शक्यता वाढवत असून विद्यार्थ्यांचे, महिलांचे, ज्येष्ठ नागरिकांचे आणि सर्वसामान्य प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत.

✅Adv.
रेल्वे कामासाठी ठेकेदारांकडून मोठ्या ट्रकांद्वारे मातीची वाहतूक अखंडपणे सुरू आहे. या जड वाहनांमुळे रस्त्यांवर तीव्र कंप निर्माण होत असून आसपासच्या घरांच्या भिंती हादरत आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे स्पष्ट मागणी केली आहे की डंपरची वाहतूक तातडीने दुसऱ्या सुरक्षित मार्गाने वळवावी किंबहुना कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
![]()
