“हा नुसता कलावंत नव्हे तर समस्त लोककला क्षेत्रातील त्यांच्या आजवरच्या अतुलनीय योगदानाची ही एक मोठी पोचपावती मानली जात आहे सोबत हा लोककलावंत आपल्या ऐतिहासिक वसईतच वास्तव्यास आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे “
विरार :- संदिप पंडित
ऐतिहासिक वसईत वास्तव्य करणारे आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख तथा जेष्ठ सिने-पार्श्वगायक डॉ. गणेश चंदनशिवे यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘सर्वोत्कृष्ट लोककलावंत’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. लोककला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची ही एक मोठी पावती मानली जात आहे.
हा पुरस्कार सोहळा दिनांक १४ जून २०२५ रोजी मुंबई येथे नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी डॉ. गणेश चंदनशिवे यांना हा बहुमान प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. चंदनशिवे यांनी लोककलेच्या जतन आणि प्रसारात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्यामुळे लोककलांना शहरी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवी ओळख मिळाली आहे. एक गायक म्हणून त्यांनी आपल्या आवाजातून अनेक लोकगीते घराघरात पोहोचवली आहेत, तर मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे प्रमुख म्हणून त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे लोककलांना शैक्षणिक आणि व्यावसायिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
यापूर्वीही लोककलेच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल डॉ. चंदनशिवे यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा हा पुरस्कार त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. या घोषणेनंतर सर्व स्तरांतून डॉ. गणेश चंदनशिवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लोककला क्षेत्रासाठी ही एक अभिमानाची बाब मानली जात आहे. वसईतील साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या साहित्य जल्लोष प्रतिष्ठान कडून डॉ.गणेश चंदनशिवे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
![]()
