पालघर जिल्ह्यातील विविध विकासकामे व अन्य उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे धडाकेबाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुसळधार पावसात ही पालघर व वसई चा दौरा करून त्यातील पहिल्या टप्प्यात पालघर जिल्ह्यातील दुर्वेस व मनोर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील नवप्रवेशीत विद्यार्थ्यांचे स्वागत केलं आणि त्यासोबत पुढे दोन दिवस संपूर्ण प्रशासन त्यामध्ये मंत्री लोकप्रतिनिधी हे सुध्दा त्या विद्यार्थ्यांचे शाळेत जाऊन स्वागत करणार आहेत तर यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप,पाठ्यपुस्तके देत अन्य विकासकामांची उद्घाटन केली
वसई :- आशिष राणे
गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षक-पालक यांचा सुसंवाद हीच भविष्यातील समृद्ध शिक्षणव्यवस्थेची किल्ली आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर तालुक्यातील PM SHRI जिल्हा परिषद शाळा, दुर्वेस येथे शाळा भेटी दरम्यान केले.
नवीन शैक्षणिक वर्ष २०२५–२६ च्या प्रारंभाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाळेला भेट देत नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे गणवेश व पाठ्यपुस्तक वाटप करून त्यांचं औपचारिक स्वागत केलं. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांचं मनोबल वाढवलं. तसेच औषधी वन उद्यानात वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक संदेश ही दिला.
दरम्यान आपल्या पालघर जिल्ह्यातील दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी डिजिटल क्लासरूम्स, ICT लॅब, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, औषधी वन उद्यान, टेरेस गार्डन आदी सुविधांची पाहणी करत त्याबाबत समाधान व्यक्त केलं.
याप्रसंगी PM SHRI योजनेअंतर्गत विकसित झालेली ही शाळा जिल्ह्यातील एक आदर्श शाळा म्हणून म्हणून ओळखली जाते त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी उपस्थित पालकांशी थेट संवाद साधत त्यांचे अनुभव जाणून घेतले.
यावेळी पालकांनी अभिमानाने सांगितले की, “या शाळेमध्ये मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते, शिक्षकांची मेहनत दिसून येते, विविध उपक्रम राबवले जातात, यासाठी आम्ही मुलांना या शाळेत पाठवतो,
तसेच विद्यार्थ्यांना डिजिटल बोर्डावर लिहिण्याचाही सराव दिला जातो. आधुनिक शिक्षण पद्धतीचा लाभ मिळतो.” या गोष्टी ऐकून मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त करत पालक, शिक्षक आणि शिक्षण विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला पालघर जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक,माजी मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार विलास तरे, आमदार राजन नाईक,आमदार राजेंद्र गावित,पदवीधर आमदार निरंजन डावखरे,शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय. एन. कुंदन, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर, तसेच विविध विभाग प्रमुख, शिक्षकवर्ग, मुख्याध्यापिका, पालक, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य आदी प्रशासकीय मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती
पालघर जिल्ह्यातील १४२ शाळांना मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी देणार भेटी
राज्य शासनाच्या ‘१०० शाळा भेट’ उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री पालघर दौऱ्यावर असून १६ व १७ जून २०२५ रोजी जिल्ह्यातील १४२ शाळांना मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी भेटी देणार आहेत. या उपक्रमामुळे शाळा, विद्यार्थी आणि पालक यांच्यातील नाते दृढ होत असून, शाळेतील उपस्थिती आणि शैक्षणिक गुणवत्ता यामध्ये सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
![]()
