ईडी च्या कोठडीत “विळ्याला मिळणार भोपळ्याची साथ” ?

आज दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी माजी आयुक्त अनिलकुमार पवार, सीताराम गुप्ता, अरुण गुप्ता आणि निलंबित टाऊन प्लॅनर वाय.एस.रेड्डी या चारही जणांना विशेष PMLA कोर्टात हजर केलं असता ईडीने चारही आरोपीच्या चौकशी साठी १० दिवस मागितले होते तर कोर्टाने या चौघाना २० तारखेपर्यंत ईडी कोठडी दिली आहे तर आरोपीच्या वकिलांनी ईडी कोठडीस विरोध केला होता,मात्र ईडीच्या सरकारी वकिलांनी वसईत घडलेल्या या कथित कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक घोटाळा व भ्रष्टाचाराची पोलखोल उघड केल्याचं पुराव्या सहित सांगितल्यावर कोर्टाने दोन्ही बाजू ऐकल्या व अखेर दुपारी चारही आरोपीना ७ दिवसांची कोठडी सुनावली तर या गुन्ह्यांचे गांभीर्य व व्यापक स्वरूप पाहता आरोपीची कसून चौकशी अजुन बाकी आहे तर ईडी च्या कोठडीत असताना त्यांच्या आजारानुसार आवश्यक ती औषधे देण्यास ही विशेष PMLA कोर्टाकडून परवानगी देण्यात आली आहे. तर आता या आठ दिवसांच्या कोठडीचा आनंद घेताना या ईडी च्या कोठडीत “विळ्याला मात्र भोपळ्याची बऱ्यापैकी साथ”मिळणार आहे ?

वसई/मुंबई :- आशिष राणे
वसई-विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांंच्यासह चौघांना २० ऑगस्ट पर्यंत विशेष ‘पीएमएलए’ न्यायालयाने ईडीची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, माजी आयुक्त पवार यांच्या वकिलांनी सुनावणी दरम्यान मोठा दावा केला होता की, अनिलकुमार पवार हे एका शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्याचे नातेवाईक आहेत, त्यामुळे त्यांची मुद्दाम बदनामी केली जाते आहे. किंबहुना शिवसेना-भाजपा मधील अंतर्गत वादातून हे प्रकरण घडविण्यात येत असल्याच ही आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात म्हंटलयं….
नालासोपारा येथील ४१ बेकायदा इमारतींप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) वसई-विरार (Vasai Virar) महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार, माजी नगरसेवक तथा बांधकाम व्यावसायिक सीताराम गुप्ता, मुलगा अरुण गुप्ता आणि निलंबित टॉऊन प्लॅनर वाय. एस. रेड्डी यांना बुधवारी (ता.१३ ऑगस्ट) रोजी अटक केली होती.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणात अखेर माजी आयुक्त पवार यांच्यासह संशयित चारही आरोपींना आज (ता.१४ ऑगस्ट) रोजी सकाळी मुंबईत विशेष ‘पीएमएलए’ न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी ईडी कडून सरकारी वकिलाने ह्या गुन्ह्याचं गांभीर्य मोठे असल्याचे सांगत आर्थिक लाभासाठी अधिकार आणि कायद्याचा सपशेल दुरुपयोग करण्यात आला आहे. दुसरीकडे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या चौकशीत माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सहकार्य केलेले नाही. या प्रकरणात अनेकांचे हितसंबंध गुंतले आहेत, त्यामुळे या चौघांना २२ ऑगस्ट पर्यंत अशी १० दिवसांची ईडीची (ED) कोठडी मिळावी, अशी विनंती सरकारी वकिलाने केली होती.
दरम्यान, सुनावणीत माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांचा त्यांच्या वकिलांनी मात्र जोरदार बचाव करण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले, की,अनिलकुमार पवार हे तपासात सहकार्य करीत आहेत. त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पवार यांच्या विरोधात ईडीकडे एकही पुरावा नाही. ईडीची ही विशेष पद्धत (मोडस ऑपरेंटी ) आहे.
या प्रकरणात कोणी एक व्यक्ती निर्णय घेत नाही तर यामध्ये कार्यालयातील अनेक विभागप्रमुखांकडून आलेल्या फाईल्स वर आयुक्तांकडून स्वाक्षरी केली जाते, असा दावा ही पवारांच्या वकिलाने दुपारी युक्तीवादात केला.
याच सुनावणी दरम्यान माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या वकिलांनी भाजप आणि शिवसेना वादाबाबतही मोठा दावा केला की, वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार हे राज्याचे शिक्षणमंत्री यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत. त्यामुळे त्यांची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. भाजप आणि शिवसेनेत वाद आहे, त्यातून हे घडवलं गेलं आहे, असेही पवारांच्या वकिलाने म्हटल्याने आता राज्याच्या राजकारणातील भल्या भल्या च्या भुवया उंचवल्या आहेत.
परिणामी न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन दुपारी निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर दुपारी तीन ते सव्वा तीन च्या सुमारास ‘पीएमएलए’ कोर्टाने हा निकाल दिला आहे. त्यात त्यांनी चारही आरोपींना येत्या २० ऑगस्ट पर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.
आता हे ईडी कोठडीत रवाना झालेले चारही कलाकार ईडी ला हव्या असलेल्या प्रश्नांना कशा प्रकारे उत्तरे देतात याकडे ही तमाम महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचे डोळे लागले आहेत.
![]()
