माझ्या मराठीकडे – महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,”…राज ठाकरे
एकत्र आलोय एकत्रित राहण्यासाठी …उद्धवजी ठाकरे
दोन दशकांनंतर एकत्र आलेले राज आणि उद्धवजी दोघेही मराठीच्या हक्कासाठी कडाडले
महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत म्हणून पवित्र आषाढी एकादशी ला या विठुरायाच्या पंढरीचा सण अवघ्या राज्यात साजरा होत असला तरी आजचा दिवस ही खास ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचा उत्सव म्हणून सर्वत्र आनंदात साजरा होताना दिसतो आहे

वसई :- आशिष राणे
“कुठल्याही वाद -विवाद, भांडणं यापेक्षा माझा महाराष्ट्र नक्कीच मोठा आहे “आणि माझ्या मराठी भाषेसाठी आम्ही दोघेही २० वर्षांनंतर पुन्हा एकाच व्यासपीठावर एकत्रित आलो आहोत तर नुसते एकत्र नाही तर यापुढेही एकत्र राहण्यासाठी आम्ही दोघे एक झालो असल्याचं विधान उद्धवजी ठाकरे यांनी भर जाहीर सभेत स्पष्ट केलं तर याखेरीज कुठचाही ‘झेंडा’ नाही, मराठी हाच ‘अजेंडा’; असल्याचं केंद्र व राज्य सरकार सोबत प्रसिद्धी माध्यमांना ही ठासून सांगत राज यांनी माझ्या मराठीकडे – महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,” असे ही ठाकरे शैलीत ठणकावले.
शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे या दोन प्रमुख मराठी पक्षांच्या वतीने आज दि ५ जुलै शनिवारी सकाळी ११.३० वाजता वरळी डोम मध्ये एकत्रित विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते

हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राविरोधातील दोन शासकीय आदेश रद्द केल्याबद्दल हा विजयी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या जाहीर कार्यक्रमात आपल्या ठाकरे शैलीतून राज ठाकरे व उद्धवजी ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी दोघांनीही सरकारचा खरपूस समाचार घेत खरंतर आज हा मोर्चा निघायलाच हवा होता म्हणजे मराठीपण मराठी माणूस व त्याची एकी व ताकद काय आहे हे कळू शकल असतं अशी खंत व्यक्त केली.
मराठी माणसाची ताकद, ठाकरे बंधूचं एकत्र येणं, मुलांचे इंग्रजी शाळेत शिकणं, त्रिभाषा सूत्र कशासाठी ? यावर दोघानीही सडेतोड भाषणं केली

नेमकी राज ठाकरे व उद्धवजी यांनी आपल्या जाहीर भाषणांत कुठल्या मुद्यावर अधिक भर देत भाषणं केली याची थोडक्यात भाषणं त्यांच्याच शब्दांत !
राज ठाकरे :- जे माननीय वंदनीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हा दोघांना एकत्र आणायचं ते फक्त देवेंद्र फडणवीसांना जमलं. आता बरेच चॅनलचे कॅमेरे सगळीकडे लागलेत. सगळं सुरू होईल आता. काय वाटतं काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती? कोणी कमी हसलं का? जास्त हसलं का? कोणी बोलतायत का? आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टीतच अनेकांना रस असतो.
मराठी हाच ‘अजेंडा –
खरं तर आजच्या मेळाव्याला कोणाचाही झेंडा नाही. मराठी हाच ‘अजेंडा माझ्या मराठीकडे-महाराष्ट्रकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही कुणी. हा प्रश्न आलाच नव्हता. काही गरजच नव्हती. हे कुठून अचानक आलं काही कळलं नाही मला. आणि हिंदी कशासाठी? कोणासाठी हिंदी? त्या लहान लहान मुलांवर जबरदस्ती करताय तुम्ही? कोणाला विचारायचं नाही शिक्षण तज्ञाना काही विचारायचं नाही. आमच्या हातात सत्ता आहे आम्ही ती लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात. आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर.
महाराष्ट्र जेव्हा पेटून उठतो तेव्हा काय घडतं ? –
”एक पत्र लिहिलं, दोन पत्र लिहिलं, नंतर ते दादा भुसे माझ्याकडे आले, मला म्हणाले आम्ही काय म्हणतोय एवढं समजून घ्या, ऐकून घ्या, दादा तुम्हाला सांगतो तुम्ही काय सांगताय ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही. कुठलं त्रिभाषा सूत्र आणलं. आलं ते फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील दुव्यासाठी त्रिभाषा सूत्र फक्त आणलं. कोर्टात, हाय कोर्टात, सुप्रीम कोर्टात जा कुठे आहे त्रिभाषा सूत्र? फक्त इंग्रजीचा वापर होतो. केंद्राच्या शिक्षण धोरणात नाही, इतर कोणत्याही राज्यातही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला त्यांनी. दक्षिणेतील राज्य हिंग लावून विचारत नाहीत, महाराष्ट्र जेव्हा पेटून उठतो तेव्हा काय घडतं, हे राज्यकर्त्यांना समजलं असेल , त्याशिवाय का माघार घेतली, असं राज ठाकरे म्हणाले.
”विनाकरण आणलेला विषय होता. मी भुसे यांना विचारलं मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार कोणती तिसरी भाषा आणणार आहात? खरं तर आणली पाहिजे. गंमत बघा हिंदी भाषिक राज्य आहेत ती आर्थिक दृष्ट्या मागास आणि हिंदी न बोलणारी राज्य आहे ती आर्थिकदृष्ट्या प्रगत आणि वरून आम्ही हिंदी शिकायचं. यांना हिंदीतून राज्य नाही सांभाळता आली, राज्याचा विकास नाही करता आला, हिंदी बोलत नाही ज्या राज्यांमध्ये हिंदी बोलत असलेल्या राज्यांमधून नोकरी धंद्यासाठी लोकं इकडे येत आहेत. आणि हे म्हणतात हिंदी शिका. कोणासाठी शिकायचं? हिंदी भाषेबद्दल मला वाईट नाही वाटत. भाषा कोणतीही असो ती श्रेष्ठच असते.” असे राज ठाकरे म्हणाले.
मुंबई स्वतंत्र करता येते का?
राज ठाकरे यांनी अचानक त्रिभाषा सूत्र आणण्यामागे सरकारच्या उद्देशाकडे सूचित करताना म्हंटले, की ”यांनी फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वतंत्र करता येते का? यासाठी भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ‘ते’ पाऊल टाकू. कोणाची माय व्यायली त्याने महाराष्ट्राला, मुंबईला हात घालून दाखवावं. काय मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडु नाही आहोत.” असा इशारा राज ठाकरे यांनी सरकारला दिला.
एकत्र आलो, एकत्र राहण्यासाठी– उद्धवजी ठाकरेनी पुन्हा पुन्हा सांगितलं !
या विजयी मेळाव्याच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर शेवटी बोलताना उद्धवजी ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचे कौतुक केले.ते म्हणतात की ‘राज आणि माझी भेट २० वर्षानंतर या व्यासपीठावर झाली. पंचायत अशी, त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे म्हटलं. साहजिकच आहे, त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलं आहे,’ असे उद्धवजी ठाकरे म्हणाले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू माता-भगिनींनो’’ अशी केली.उद्धव ठाकरे यांनी मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष भाषणापेक्षा त्यांच्या एकत्र दिसण्यावर असल्याचे नमूद केले. माझ्या भाषणाची काही गरज आहे, असे मला वाटत नाही.
आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यावर सर्वांचे लक्ष भाषणाकडे आहे. पण भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं याकडे सर्वांचं लक्ष आहे, असेही ते म्हणाले.
अर्थात एकत्र आलो, एकत्र राहण्यासाठी राजकीय वर्तुळातून त्यांच्या एकत्र येण्यावर सुरू असलेल्या चर्चांनाही उद्धवजी ठाकरे यांनी प्रति उत्तर दिले. आमच्या दोघांतील अंतरपाट होता तो अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलो. एकत्र राहण्यासाठी, असे ही उद्धवजी ठाकरे म्हणाले.
आज मला कल्पना आहे. अनेक बुवा, महाराज बिझी आहेत. कोण लिंबं कापतंय, कोण टाचण्या मारतंय. कोण गावी जाऊन अंगारे-धुपारे करत आहेत. त्या सर्वांना सांगतो, या भोंदूपणाविरोधात माझ्या आजोबांनी लढा दिला होता. त्यांचे वारसदार म्हणून आम्ही उभे ठाकलो आहोत, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस, ऐका ना त्यांचाच शब्दांत !
“हा विजयोत्सव नव्हे ही तर रूदाली होती”….!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
२५ वर्षे महापालिका ताब्यात असूनही एकही चांगले काम नाही याची असूया. त्यांच्या काळात मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला पण आम्ही त्यांना हक्काची मोठी घरे दिली. मराठीचा अभिमान आहे त्यासोबत आम्हाला हिंदूत्वाचा ही अभिमान. आमचे हिंदूत्व सर्वांना सोबत घेऊन चालणारे बस्स !
![]()
