“ऑनलाईन हमाल कंत्राटदाराकडून आर पी एफचा बेकायदेशीर वापर” रेल्वे मंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष केंद्रित करावे “!
वसई :- आशिष राणे
वसई रोड रेल्वे स्थानकावर मागील २० वर्षांपासून निष्ठेने कार्यरत असलेल्या हमाल बांधवांवर अचानक संकट कोसळले आहे. नव्याने आलेल्या ऑनलाईन हमाल कंत्राटामुळे या पारंपरिक हमालांना त्यांच्या कामावरून हटवले गेले असून, त्यांच्यावरील उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदाराकडून रेल्वे सुरक्षा दल (RPF) च्या माध्यमातून या हमालांना हटवण्यात आले. एवढ्यावरच न थांबता, विरोध करणाऱ्या हमालांना “पट्ट्याने मारू, गुन्हे दाखल करू” अशी धमकी देण्यात आली, असा आरोप स्थानिक हमाल बांधवांनी केला आहे.
या अन्यायकारक व बेकायदेशीर प्रकाराची गंभीर दखल भारतीय जनता पार्टीने घेतली आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाच्या केरळ प्रकोष्ठाचे संयोजक उत्तम कुमार यांनी स्थानिक भाजपा पदाधिकारी सिद्धेश तावडे, बाळा सावंत, एच आर सक्सेना यांच्या सोबत वसई रोड स्थानकाच्या स्टेशन मॅनेजर व RPF अधिकाऱ्यांची भेट घेऊन हा मुद्दा उचलून धरला.
त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे जाब विचारत या हमाल बांधवांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. उत्तम कुमार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “दोन दशके सेवा देणाऱ्या हमालांना एका क्षणात हटवून नव्या ऑनलाईन यंत्रणेचा अंमल करणे हा फक्त अन्याय नाही, तर त्यांच्या कुटुंबाच्या रोजीरोटीवर गदा आणण्यासारखे आहे.
दरम्यान आम्ही या प्रकाराची सखोल चौकशी आणि अन्यायग्रस्त हमालांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू ठेवू.”असे उत्तम कुमार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
स्थानिक हमाल बांधवानी या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला असून, प्रशासनाने या प्रकरणात हस्तक्षेप करून कामगिरी बजावणाऱ्या हमाल बांधवांचे हित जपावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वसई रोड रेल्वे प्रशासनाने याबाबतीत आम्ही सुद्धा वरिष्ठ पातळीवर ही गोष्ट कळवणार आहोत, मागील २० वर्षापासून वसई रेल्वे स्थानकावर सेवा देणाऱ्या हमाल बांधवांवर अन्याय व्हावा अशी आमची सुद्धा इच्छा आणि तशी मानसिकता ही नसल्याची भूमिका असल्याचे या बैठकीत सांगितले.
हमालांना न्याय न मिळाल्यास भविष्यात भाजपा रस्त्यावर उतरेल अशी भूमिका भाजपा ने घेतली असून याबाबत लवकरच पुढील बैठक होणार असल्याचे शेवटी उत्तम कुमार यांनी सांगितले.
![]()
