वसई/विरार : –
महसूल विभागातील तलाठी व मंडळ अधिकारी संगनमत करून वसईकर जनतेचे सातबारा नोंद व फेरफार आर्थिक फायद्यासाठी रखडवून त्यांना त्रास देत असतील तर या प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात येईल. यात दोषी आढळणाऱ्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल,असे आश्वासन वसई उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी दिले आहे.
वसई महसूल कार्यालयातील तलाठी-मंडळ अधिकारी तीन वर्षांहून अधिक काळ एकाच जागेवर ठाण मांडून आहेत त्यामुळे भ्रष्टाचाराला उत्तेजन मिळत असल्याने त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी, महसूल विभागा सह,वसई भूमिअभिलेख कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराविरोधात वसईतील सामाजिक कार्यकर्ते एलयास डिसिल्वा यांनी दि ८ मे रोजी वसईतील देवतलाव या ठिकाणी आंदोलन पुकारलेले होते.
वसई चे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी या आंदोलनाची दखल घेतली आणि एक बैठक घेऊन त्या माध्यमातून तोडगा काढण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले होते.
त्यानुसार,दि १४ मे रोजी वसई उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांतील अधिकारी व आंदोलनकर्ते यांच्यात बैठक पार पडली.
या बैठकीत वसई उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी सखोल चौकशी करून दोषी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान; वसई तालुक्यात आर.टी.ओ विभागा अंतर्गत येणारी वाहने व त्यांचे परवाने नियमबाह्य असताना आरटीओच्याच आशीर्वादाने ही वाहने रस्त्यांवर धावत आहेत. पाणी वाहून नेणारे टँकर, मॅजिक-डमडम अशा नियमबाह्य वाहनांवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे पंधरवड्याने कारवाईची मोहीम सुरू करण्यात यावी, अशा सूचना या बैठकीत करण्यात आल्या. याशिवाय; वसई भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. त्यांच्यामार्फत आलेल्या कामांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाते. नुकताच या कार्यालयात ९ वर्षांपासून ठाण मांडून असलेल्या खासगी कर्मचारी महिलेसोबत गैरप्रकार घडला होता. वसईकर जनतेने त्यावर आक्षेप घेतल्यानंतर या महिलेला कामावरून कमी करण्यात आले होते.
अनेक वर्षांपासून वसईकरांची प्रकरणे प्रलंबित आहेत. आर्थिक फायद्यासाठी अधिकारी जनतेला त्रास देत आहेत. वसईकर जनतेच्या हक्काची जमीन असताना हे अधिकारी कशाच्या आधारे हुकूमशाही करतात ? असा परखड सवाल एलियास डिसिल्वा यांनी केला होता. त्यावर भूमीअभिलेख कार्यालयातील तक्रारी संबंधित सर्व प्रकार पालघर जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक यांच्या समोर मांडणार असल्याचे वसई उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी सांगितले.
अर्नाळा – वसई राज्य मार्गावर खोदकामामुळे खड्डे झाले उदंड !
अर्नाळा-वसई राज्य मार्गावर जलवाहिनी अंथरण्यासाठी खोदकाम सुरू आहे. त्याकरता अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे. त्यामुळे पश्चिम पट्ट्यात राहणाऱ्या अनेक नागरिकांना वाहनधारकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे, हा मुद्दा देखील डिसिल्वा यांनी या वेळी उपस्थित केला होता. त्यावर बैठकीला उपस्थित पालिकेच्या अभियंत्यांनी १० टक्के काम शिल्लक असून पावसाळ्याआधी तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
विशेष म्हणजेे वसई उपविभागीय अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेतल्यानंतर वसई तालुक्यातील संबंधित सर्व शासकीय अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. तर आंदोलनकर्त्यांत एव्हरेस्ट डाबरे, नेल्सन डिसोजा, निलेश वर्तक, रॉबी डिसोजा, विल्सन आल्मेडा, उमेश आल्मेडा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
***
![]()
