संवाद दुरावत चालला आहे काय..? त्यातील उणीवा कशा भरून निघतील, संवाद व समुपदेशन किती आवश्यक झालं आहे ? अर्थात तरुण मुले मुली मग ती वयात आलेली किंवा अल्पवयीन असो, मात्र या सर्व मुलांचं वर्तन हे त्यांच्या आतल्या संघर्षाचं प्रतिबिंब असतं….
आत्महत्या हा काही क्षणिक निर्णय असतो पण त्या क्षणांमध्ये जर कोणी त्यांच्याशी उत्तम व स्पष्ट असा सुसंवाद व समुपदेश साधला असता, त्यांचं ऐकलं असतं, समजून घेतलं असतं तर आज ती सर्वजण आपल्या सोबत असती नाही का..! तर आपल्याला संवादा मधील उणीवा शोधून त्यावर उपाययोजना करायच्या आहेत…त्यामुळे चला.. ऐकू या थोडंसं..

वसई :- निकिता पटेल✍️
सध्या वसई परिसरात तरुण असो की अल्पवयीन मात्र अशा तरुण मुलांच्या आत्महत्यांचे सत्र चिंताजनक ठरत आहे.
गेल्या काही दिवसांत -महिन्यात काही निरागस जीवांनी स्वतःचे शेवट स्वतःच घडवून आणले असून या गंभीर घटना दिवसेंदिवस केवळ पालकांसाठीच नव्हे, तर आपल्या संपूर्ण समाजासाठी धोक्याच्या घंटा बनत चालल्या आहेत.
या दुर्दैवी घटनांची कारणं अनेक असू शकतात उदाहरण दयायचे तर परीक्षेचा ताण, मैत्रीतील वाद, आत्मविश्वासाचा अभाव, सोशल मीडियामुळे निर्माण होणारी तुलना, व्यसनाधीनता, डिजिटल अरेस्ट किंवा पालकांशी तुटलेला संवाद. मात्र सर्व घटकांच्या मुळाशी एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते ती म्हणजे संवादाचा अभाव.
संवाद का गरजेचा आहे ?
संवाद म्हणजे मानसिक आरोग्याचा श्वास आहे.
मुलांचे विचार, भावना, शंका, गोंधळ हे सर्व जर त्यांनी व्यक्त केले नाहीत, तर ते मनात साठून आतून पोखरत जातात. जर त्यांना वाटले की कोणीही त्यांचे ऐकत नाही, समजून घेत नाही, तर ते एकटे पडतात. आणि याच एकटेपणात मनावरचा ताण असह्य होतो.
समुपदेशनाचे महत्त्व….
समुपदेशन म्हणजे ‘सुनावणी’ नव्हे, तर ‘समजावणी’.
आजच्या धकाधकीच्या जीवनात, मुलांना कुणीतरी विश्वासू हवं असतं जे त्यांचं न ऐकण्यासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी असतं. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून मी पाहते की, जे मुलं उघडपणे बोलत नाहीत, ती मनात खूप काही लपवून ठेवतात. समुपदेशनाच्या माध्यमातून ती भावना बाहेर काढता येतात
केवळ एक वेळचा संवादही त्यांच्या मानसिकतेत मोठा बदल करू शकतो. परंतु ह्यासाठी अनुभवी समुपदेशक असणे फार गरजेचे आहे.
सध्याच्या परिस्थितीत कोणतेतरी ऑनलाईन प्रशिक्षण घ्यायचे आणि समुपदेशक बनायचे हे फॅड पण दिसून येत आहे. त्यामुळे अनुभवी समुपदेशकांकडूनच समुपदेशन करून घेणे गरजेचे आहे.

पालकांनी काय करावं ?
1. दररोज संवाद साधा: ‘शाळा कशी झाली ?’ यापेक्षा ‘आज काय नवीन शिकलास/शिकलीस?’, ‘काही खट्टा-गोड प्रसंग घडला का?’ — असे विचार करा.
2. जज न करता ऐका: मुलांनी काही चुकलं, तरी लगेच शिक्षा देण्यापेक्षा, का चुकलं हे जाणून घ्या.
3. तुलना टाळा: ‘बघ फलाण्याचं बाळ किती शहाणं आहे’ या वाक्यांनी मुलांच्या मनावर खोल घाव होतात.
4. भावनिक जवळीक ठेवा: त्यांच्या मैत्रीचा भाग व्हा, फक्त पालक म्हणून आदेश देऊ नका.
5. तणावाचे लक्षण ओळखा: एकांतवास, भूक मंदावणे, रडका स्वभाव, चिडचिड — हे लक्षणं दुर्लक्षित करू नका.
मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना….
1) शाळांमध्ये समुपदेशन केंद्रे सुरु करणे गरजेचे आहे.
2) मनोधैर्य वाढवणाऱ्या कार्यशाळा (वर्कशॉप्स), योग, ध्यानधारणा कार्यक्रम वाढवावेत.
3) सामाजिक संवादाचे व्यासपीठ — नाट्य, संगीत, खेळ — यांच्यामध्ये मुलांचा सहभाग वाढवावा.
4) सोशल मीडियावर नियंत्रण व मार्गदर्शन आवश्यक.
5) योग्य समुपदेशकाची मदत उपाययोजना म्हणून अनुभवी आणि योग्य समुपदेशकाची वेळीच मदत घेणे.
मुलांचं वर्तन हे त्यांच्या आतल्या संघर्षाचं प्रतिबिंब असतं. आत्महत्या हा काही क्षणिक निर्णय असतो पण त्या क्षणांमध्ये जर कोणी त्यांच्याशी संवाद साधला असता, त्यांचं ऐकलं असतं, समजून घेतलं असतं तर आज ते आपल्या सोबत असते आणि म्हणूनच, संवाद सुरू करा त्याआधी की शांतता कायमची गाठून जाईल.
माहिती व संपर्कासाठी… खालील पत्ता किंवा मोबाईल वर संपर्क करावे…
लेखिका सौ. निकिता अमित पटेल
(क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट)
मनोबल चाईल्ड डेव्हलपमेंट आणि थेरपी सेंटर,
दुसरा मजला, डॉमिनोज पिझ्झा च्या वर, पंचवटी, वसई (पश्चिम)
9021318242
![]()
