पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांना आधार असलेल्या बंगली येथील कार्डिनल ग्रेशस मेमोरियल हॉस्पिटलला डी.एन.बी (DNB) मान्यता मिळाली आहे,आनंदाची बाब अशी की, या मान्यते अंतर्गत मेडिकल च्या विद्यार्थ्यांना याठिकाणी जनरल मेडिसिन व इमर्जन्सी मेडिसिन या महत्त्वाच्या विषयांमध्ये डीएनबी 3 वर्षाचा अभ्यासक्रम या वर्षापासून सुरू होत असल्यामुळे आता वसई -पालघर मधील विद्यार्थ्यांना मुंबई गाठण्याची गरज न पडता,आपल्या परिसरातच उच्च दर्जाचे वैद्यकीय शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी यनिमित्ताने प्राप्त झाली आहे.

वसई :- आशिष राणे
वसईकरांचा अभिमान असलेल्या कार्डिनल ग्रेशस मेमोरियल हॉस्पिटलला आता नव्या पातळीवर शैक्षणिक मान्यता मिळाली आहे. “नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस” NBEMS यांनी या रुग्णालयाला अधिकृतपणे डीएनबी टिचिंग हॉस्पिटल म्हणून मान्यता दिल्याची महत्वपूर्ण माहिती रुग्णालय प्रशासनाच्या जनरल मॅनेजर प्लॉरी डिमॉन्टी यांनी दि.11 सप्टेंबर रोजी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे माध्यमांना दिली आहे.
या विषयी अधिक माहिती देताना रुग्णालय प्रशासनाने सांगितले की,या अंतर्गत जनरल मेडिसिन व इमर्जन्सी मेडिसिन या महत्त्वाच्या विषयांमध्ये डीएनबी 3 वर्षाचा अभ्यासक्रम या वर्षापासून सुरू होत असून, प्रवेश NEET-PG व NBEMS समुपदेशनाद्वारे होणार आहे.
यामुळे वसई -पालघर मधील विद्यार्थ्यांना आता मुंबई गाठण्याची गरज न पडता,आपल्या परिसरातच उच्च दर्जाचे वैद्यकीय शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

विविध क्लिनिकल उपकरणे, अत्याधुनिक सुविधा आणि रुग्णसेवेचा प्रत्यक्ष अनुभव यामुळे वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावेल.
चार दशकांहून अधिक काळ समाजाची निस्वार्थ सेवा करणाऱ्या या रुग्णालयाने शिक्षणाच्या क्षेत्रातही नवा अध्याय सुरू केल्याने वसईकरांचा अभिमान दुणावला आहे.
स्थानिक रुग्णांना उत्कृष्ट आरोग्य सेवा तर मिळेलच, पण भावी तज्ञ डॉक्टर ही इथून घडतील, असा विश्वास रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केला आहे.
![]()
