भटकंती विशेष :- “राईस बाउल ऑफ इंडिया”

 

पर्यटन विशेष :- नितांत राऊत, वसई ( यांच्या प्रत्यक्ष भटकंती वेळी नोंदवलं गेलंल निरीक्षण त्यांचाच शब्दांत ) 

मोहक रमणीय किनारे , नयनरम्य मंदिरे आणि सुंदर पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध , शिल्पसमृद्ध मंदिरे आणि इतिहासाचा वारसा जपणारी धौली, उदयगिरी, खंडगिरीसारखी ठिकाणे, पंपोश या ठिकाणी असणारी सर्वात मोठी हनुमानाची मूर्ती असणारी हनुमान वाटिका हे स्थान , आपल्या देशामधिल सार्वजनिक क्षेत्रामधिल सर्वात प्रथम आणि जवळपास १९ लाख टन पोलाद निर्मिती करण्याची क्षमता आसलेला राऊरकेला येथिल पोलाद कारखाना , महानदीवर बांधलेले हिराकूड धरण. बालासोरचे क्षेपणास्त्र परीक्षण केंद्र , गर्द जंगलात वसलेले कोरापुट, तर वन्यजीवांसाठी प्रसिद्ध अशी नंदनकानन, सिमलीपालसारखी अभयारण्ये , मंगलाजोडी – भितरकर्णीका यासारखे विविध जैववैविध्याने परिपूर्ण रामसर प्रदेश अशा सर्वच गोष्टींनी संपन्न असलेले , सुवर्णरेखा नदीपासून ऋषिकूल्येपर्यंत आणि मेकल राज्यासून कपिशेपर्यंत असा ज्याच्या सीमांचा उल्लेख आहे ,सुद्युम्‍नपुत्र उत्कल याने स्थापन केलेले उत्कल राज्य म्हणजेच आजचे ऒडिशा किंवा ओरिसा राज्य .

क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केल्यास एक छोटासा परंतु अनेक वैविध्यांनी नटलेला हा प्रदेश एक चक्रवर्ती सम्राट ते अहिंसा, दया, शांती व उदात्त मानवी मुल्यांचा जोपासक आणि मौर्य शासन संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांचा नातू  सम्राट अशोक या चक्रवर्ती सम्राटाच्या जिवनाशी अत्यंत जवळून निगडित आहे. राईस बाउल ऑफ इंडिया अशी प्रौढी मिरवणार्‍या ओडिशाचा इतिहास इसवी सनाच्या पूर्वी दुसऱ्या-तिसऱ्या शतकापर्यंत मागे जातो. सम्राट अशोक , राजा खारवेलपासून ते अगदी गंगवंशीय राजवटीपर्यंतचे पुरावे आणि संदर्भ इथे पाहायला मिळतात. इथल्या राजवटी या संपन्न आणि समृद्ध तसेच विजिगीषू वृत्तीच्या होत्या आणि राज्याच्या सीमा सर्वदूर कशा पसरतील याची जाणीव ठेवूनच त्यांचा कारभार चालत असे. राज्यविस्ताराबरोबरच कला आणि संगीत या क्षेत्रांना मोठे पाठबळ देणारी अशी इथली राजघराणी होती. इथल्या प्रजेवर, कलेवर, संस्कृतीवर त्याचा उमटलेला ठसा आजही अबाधित आहे साधारणत: ओरिसा म्हणजे पुरी-कोणार्क एवढीच आपली माहिती आसते. येथल्या पर्यटनाचा विचार करायचा झाल्यास पर्यटनाच्या दृष्टीने अनेक आश्चर्यकारक गोष्टी इथे आहेत. इ.स.पूर्व २६१ मध्ये झालेल्या कलिंग युद्धानंतर याच ठिकाणी सम्राट अशोकाचे हृदयपरिवर्तन होऊन युद्धात झालेला रक्तपात पाहून हतबल होऊन त्याने भविष्यात कधीही युध्द व रक्तपात न करता शांती व अहिंसा मार्गाचा आजीवन अवलंब करण्याचा दृढ संकल्प करून बौद्ध धर्माचा स्विकार केला . मध्य प्रदेशातील सांचीचा स्तूप आणि सारनाथ येतील शिलालेख स्तंभ विश्व प्रसिद्ध आहेत . सारनाथ येथील त्रिमूर्ती शिला स्तंभ व अशोक चक्र या वास्तू आज भारतातील प्रमुख वास्तू म्हणूनच  ओळखल्या जातातच त्याशिवाय  भारतीय राष्ट्रध्वजामध्येही सम्राट अशोक राजाच्या महान कारकिर्दीची साक्ष देत आज भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून अशोक चक्र ओळखले जाते.

तुलनेने स्वस्त असणार्‍या ओरिसा राज्याची सफ़र ही आपल्याला आपल्या धावपळीच्या आणि दगदगीच्या आयुष्यामध्ये एक अविस्मरणीय अनुभव ठरतॊ . वन्यजीव अधिवास आणि संवर्धन क्षेत्रामध्ये कार्यरत असणार्‍या काही निवडक संस्था या निसर्गरम्य परिसराची सफर घडवून आणण्यामध्ये अग्रगण्य आहेत त्यातील एक काही निसर्गवेड्या मित्रांनी एकत्र येऊन सुरू केलेली ” वाईल्ड हॅबिटाट जर्निज ” ही गेल्या काही वर्षांपासुन अपरिचित आणि अनवट निसर्गस्थळांची सफ़र घडवण्यात अग्रेसर असणारी एक संस्था अत्यंत माफक अश्या दरामध्ये ओरिसाची सफर घडविण्यामध्ये अग्रेसर आहे.  ओरिसा राज्याचा हा सफरनामा सुरु होतो राज्याची राजधानी भुवनेश्वर पासून ……

मंदिरांची नगरी – भुवनेश्वर 

अगदी प्राचीन काळापासून भुवनेश्वर हे मंदिरांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. अतिशय छोटेखानी असे हे शहर फिरण्यासाठी सर्वात सोयीस्कर मार्ग म्हणजे रिक्षा किंवा खाजगी गाडी . येथील मंदिरे तुलनेने जवळजवळ असल्याने प्रवासामध्ये फारसा वेळ जात नाही . भुवनेश्वर शहराच्या ओल्ड टाऊन नावाच्या भागामध्येच ओडिसी स्थापत्य शैलीतील मजबूत आणि अत्यंत दिमाखदार प्राचीन मंदिरे पाहता येतात. या सर्वांचा मेरुमणी म्हणुन ज्या मंदिराची ख्याती आहे ते मंदिर म्हणजे लिंगराज मंदिर. अत्यंत सुंदर आणि बारकाईने केलेली मूर्तीकला आणि ओडिसी स्थापत्य शैलीचा एक अजोड ठेवा असणारे हे भव्यदिव्य मंदिर अतिशय लांबवरून आपल्या दृष्टीपथात येते. मंदिर परिसरामध्येच असलेले भले मोठ्ठे तळे या परिसराची शोभा अजूनच वाढवते. याच मंदिराच्या परिसरात अगदी चालत फिरता येतील अशी अनंत वासुदेव मंदिर, केदारेश्वर मंदिर, वेताळ मंदिर यासारखी बरीच मंदिरे एकामागे एक उभी आहेत. परशुरामेश्वर मंदिर आणि त्याला लागूनच असलेले मुक्तेश्वर मंदिर हे अत्यंत देखणे आणि अत्यंत सुंदर असे म्हणावे लागेल. अगदी टुमदार असलेल्या या मुक्तेश्वर मंदिरासमोर एक दगडी कमान आहे ज्यातून आपला या परिसरात प्रवेश होतो. याशिवाय ओडिशा स्टेट म्युझिअम आणि ओडिशामधिल आदिवासि जमातीच्या पारंपारिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे ट्रायबल म्युझियम ही भुवनेश्वर शहरामध्ये चुकवू नये अशी ठिकाणे आहेत.

भुवनेश्वर शहरापासून साधारणपणे 7 कि.मी. अंतरावर असणार्‍या टेकड्यांमध्ये १९ व्या शतकात प्रथम ब्रिटीश अधिकारी एंड्रयू स्टर्लिंगने शोधलेला उदयगिरी व खंडागिरी हा लेणी समुह हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे . या लेण्यांचा इतिहास गुप्त काळापासूनचा असुन जैन भिक्क्षुंना राहण्यासाठी त्या बांधल्या गेल्याचे उल्लेख इतिहासामध्ये आढळून आलेले आहेत. डोंगराच्या उजव्या बाजूला असणार्‍या उदयगिरी लेणीमध्ये 18 लेणी / गुंफा तर दुसरीकडे खंडागिरी लेणीमध्ये सुमारे १५ गुंफा आहेत. उदयगिरी लेणी या जैन भिक्षूंच्या गुरूंचे निवासस्थान असुन राणी गुंफा आणि बाजघर गुंफा सर्वात सुंदर आणि पवित्र मानल्या जातात. याशिवाय छोटा हाथी गुंपा, अलकापुरी गुंढा, पणसा गुंपा आणि गणेश गुंफा आदी गुंफा येथे प्रसिद्ध आहेत. डोंगराच्या डाव्या बाजूला खंडागिरि लेण्यांचा समुह असून या गुहांभोवती नैसर्गिक हिरवाईने नटलेले वातावरण आहे. खंडागिरी लेण्यांबद्दल असे म्हटले जाते की जैन धर्माचे शिष्य येथे राहत होते. एकूण १५ गुंफांचा हा समुह असून त्यामध्ये टाटोवा गुंपा, अनंत गुंपा, ध्यान गुंफा, अंबिका गुंपा आणि नव मुनी गुंफा आदी प्रमुख आहेत. या गुहेत 24 जैन तीर्थंकरांचे पुतळे देखील आहेत.

ओरिसा राज्याला सम्राट अशोकाचा वारसा लाभलेला आहे . त्याच्याच काही पाऊलखुणा आजही भुवनेश्वर आणि आसपासच्या परिसरामध्ये पाहायला मिळतात . आधी उल्लेख केल्याप्रमाणे सारनाथ येथील त्रिमूर्ती शिला स्तंभ व अशोक चक्र याच बरोबर भुवनेश्वर शहराला लागुन असलेल्या धौलिगिरी या टेकडीवर असणारा शांती स्तुप हे भुवनेश्वरला भेट देणार्‍या पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे.

जगन्नाथ पुरी

आपल्या देशामधला सर्वात मोठा आणि आतिशय रमणीय आणि जवळपास ७ किलोमिटर एवढा विस्तिर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या ओडिशाचे सगळ्यात प्रमुख आकर्षण असणारे ठिकाण ; हिंदू संस्कृतीमध्ये चार धाम क्षेत्रांमधिल एक धाम म्हणजेच पुरी स्थित जगन्नाथ मंदिर .  भगवान विष्णूंच्या पुरुषोत्तम नीलमाधव अवताराशी या भव्यदिव्य मंदिराचा इतिहास निगडीत आहे. हजारो वर्षापूर्वी निर्माण केली गेलेली एक शक्तिशाली रहस्यमय ऐतिहासिक वास्तू  म्हणून जगन्नाथ मंदिराची ओळख आहे. . मंदिराच्या शिखरावर असणार्‍या ध्वजाजे वार्‍याच्या विरुद्ध दिशेने फडकणे किंवा निसर्ग नियम झुगारुन दिवसा वारा जमिनीवरून समुद्राकडे तर रात्री स्मुद्राकडुन जमिनिकडे वाहणे , मंदिर परिसरामध्ये प्रवेश केल्यानंतर समुद्रांच्या लाटांचा कोणताही ध्वनी आप्ल्याला ऐकू न येणे या सारख्या अनेक रहस्यमय आणि अनाकलनीय गोष्टी ज्याचे स्पष्टीकरण शोधण्याचा प्रयत्न आजही वैद्न्यानिक करत आहेत. दर वर्षी आषाढ महिन्यामध्ये पार पडणारी येथील रथ यात्रा हे देश-विदेशामधिल पर्यटक आणि भाविकांसाठी एक पर्वणी असते.

जगन्नाथ मंदिराव्यतिरिक्त  बंगालच्या उपसागराला लागुन जवळपास ४८५ किलोमिटर समुद्र किनारा ओडिशाला लाभलेला आहे. या पैकी पुरीचे आकर्षण असणारा आतिशय रमणीय आणि जवळपास ७ किलोमिटर एवढा विस्तिर्ण समुद्रकिनारा आणि येथिल कलाकारांची वालूका शिल्पकला  जगप्रसिद्ध आहेत . पुरीच्या समुद्रकिनार्‍याव्यतिरिक्त शांत आणि शहरी कोलाहला पासुन दूर परंतू अत्यंत रमणीय असे काही किनारे आणि अपरिचित स्थळे

ओडिशामद्ये आपल्याला बघता येतात . त्यातीलच एक म्हणजे बरहामपुरपासुन ३० किलोमिटर असणारा शांतआणि अत्यंत नितळ निळ्या पाण्याने घेरलेला समुद्रकिनारा अशी ओळख निर्माण होत असलेला आर्यपल्ली बीच  . बरहामपुरपासुनच १६ कि.मी अंतरावर असणारा असाच आणखी एक किनारा म्हणजे गोपालपुर बीच . महानंदी नदी आणि बंगालचा उपसागर ज्या ठीकाणी एकत्र येतात तो  आणखी एक किनारा म्हणजे जगतसिंहपुर जिल्ह्यामधिल पारादीप बीच.

कलाकारांचे ऐतिहासिक वारसा गाव – रघुराजपूर आणि पिपली

ओडिशा  सफ़रीमध्ये हटके असणार्‍या ठिकाणांमध्ये न वगळता येणार्‍या ठिकाणांपैकी एक म्हणजे ओडिशा सरकारने ” ऐतिहासिक वारसा गाव  ” दर्जा दिलेले , सुप्रसिद्ध नर्तक केलुचरण महापात्र यांचे जन्मगाव आणि जगन्नाथपुरी पासुन साधारण १० कि.मी. अंतरावर असणारे अत्यंत सुंदर असे कलाकाराचं गाव रघुराजपूर आणि जवळच असणारे पिपली .  जवळपास १२५ घरांचे आणि प्रत्येक घरामध्ये कलाकार असणारे रघुराजपुर हे गाव . गावाच्या मधोमध असणारी मंदिरांची रांग आणि त्या सभोवताली शिल्पकार, चित्रकार, लाकडावर कोरीव काम करणारे, रंगकाम करणारे ,पट्टचित्रकार  अश्या कलाकारांची सुंदर चित्रांनी सजविलेली आणि  घराबाहेर विविध मूर्ती असलेली घरे हे येथिल सर्वसामान्य चित्र . ओडिशाचे वैशिष्ठ्य असलेली पट्टचित्रकला जोपासणारे  कलाकार या गावाची शान आहे. गावाच्या एका टोकाला असणार्‍या अत्यंत टुमदार बंगलीमध्ये पट्टचित्रकला शिकायच्या उद्देशाने येथे आलेल्या परदेशी कलाकारांची कलाही आपल्याला खुणावल्याशिवाय रहात नाही.

सूर्याचा कोपरा – कोनार्क सूर्यमंदीर

भारतीय इतिहासातील खूप जुने आणि पौराणिक अशी ज्याची ख्याती आहे आणि जागतीक वारसा स्थळांम्ध्ये समावेश असलेले  रहस्यमय म्हणून ओळखले जाणारे मंदिर म्हणजे भगवान सूर्याला समर्पित कोणार्क सूर्य मंदिर. पुरी येथील भगवान श्रीकृष्ण, सुभद्रा आणि बलाराम जी यांच्‍या भव्‍य मंदिराच्‍या पवित्र स्थानापासून तसेच पुरीच्या समुद्र किनार्‍यापासून काही किलोमीटर अंतरावरअंतरावरच हे मंदिर आहे. असे म्हणतात की, जेव्हा एखादे जहाज समुद्रातील मध्यभागी या मंदिराच्या गुरुत्वाकर्षणावरून जाते, तेव्हा ते जहाज आपोआप किनार्‍याकडे खेचले जाते.

या मंदिरची भव्यता आणि कलाकुसर आपल्याला मंत्रमुग्ध केल्याशिवाय रहात नाही . या रहस्यमय मंदिराचे नाव कोनार्क सूर्य मंदिर का असावे या गोष्टीचा विचार केल्यास ” कोन ( कोपरा ) + आर्क ( सुर्य ) = कोनार्क ” ही व्युत्पत्ती स्पष्ट होते. कोणार्कचे सूर्य मंदिर १३ व्या शतकाच्या मध्यावर बांधले गेल्याचे दाखले इतिहासामध्ये सापडतात. एक महान शासक नरसिंहदेव पहिला या राजाच्या कारकिर्दीत सुमारे १२४३ ते १२५५ या काळात या मंदिराचे बांधकाम सुरू झाले असावे असे दिसते. पारंपारिक कलिंग पद्धतीनुसार सूर्यदेवाच्या रथाच्या आकारात बनवले गेलेल्या या  मंदिराची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की सूर्य भगवान आपल्या रथावर विराजमान असुन ते पुढे जात आहेत असे प्रतित होते. या रथात १२ मीटर रुंद धातूंनी बनविलेल्या चाकांच्या दोन जोड्या असून  त्यासमोर सात घोडे चार उजवी बाजू व तीन डाव्या बाजूला आहेत. सध्या सातपैकी फक्त एक घोडा शिल्लक आहे. हे मंदिर पूर्वेच्या दिशेने अशा प्रकारे बांधले गेले आहे की सूर्याची पहिली किरणे थेट मंदिराच्या प्रवेशद्वारावर पडतील . या मंदिराची उंची २२९ फूट म्हणजेच ७० मीटर आहे

पौराणिक कथांनुसार भगवान श्रीकृष्ण यांचा मुलगा सांबा यांना कुष्ठरोगाचा शाप मिळाला. ऋषी कटक यांनी सांबाला मित्रवन मधील चंद्रभागा नदीच्या काठावर भगवान सूर्यची उपासना करण्यास सांगितले त्याप्रमाणे चंद्रभागा नदीच्या काठावर सुमारे १२ वर्षे सतत केलेल्या कठोर तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन सांबाला कुष्ठरोगापासून मुक्ती दिली. असे म्हणतात की, सांबाने चंद्रभागा नदीच्या गर्भाशयात पूर्णपणे भगवान सूर्यदेवाला समर्पित हे कोनार्कचे सूर्य मंदिर बांधले.

काही पौराणिक कथांनुसार कोणार्कच्या सूर्य मंदिराच्या शिखरावर एक चुंबकीय दगड ठेवण्यात आला होता. या चुंबकीय दगडाचा असा प्रभाव होता की समुद्राकडे जाणारे प्रत्येक पाण्याचे जहाज आपोआप या मंदिराच्या दिशेने ओढले जायचे आणि बर्‍याचदा मार्गावरुन भटकून जायचे. असे म्हणतात की काही मुस्लिम नाविकांनी हा दगड मंदिरावरुन काढला आणि आपल्‍या सोबत घेऊन गेले.

ओडिशाचे शनि शिंगणापूर – सीरिलिया गाव

भुवनेश्वरपासून १३० किमी अंतरावर राजकणिका या तालुक्याच्या ठिकाणापासून फक्त ५ कि.मी. वर जवळपास 80 – 90 घरे असणारे सीरिलिया हे गाव . या गावामध्ये कोणत्याही घराला दरवाजा नाही. गावची देवता खोखराई ठकुरानी देवीच घराच्या उंबरठय़ावर बसली आहे आणि घराचे रक्षण करते आहे या श्रद्धेमधुन कोणत्याही घराला दरवाजा नाही. या गावात चोरी होत नाही. गावाच्या एकईकडे असणार्‍या देवळामधील  देवीला नवस बोलताना लाकडाचा किंवा मातीचा घोडा वाहायची पद्धत आहे त्यामुळे मंदिराच्या परिसरात या घोडय़ांच्या असंख्य मूर्ती पाहायला मिळतात. अत्यंत जागृत देवस्थान म्हणून हे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.

 उत्कल अर्थात ओडिशा राज्याची सफ़र ही येथल्या आगळ्या वेगळ्या प्राणी-पक्ष्यांच्या दुनियेचा आणि जैवविविधतेचा अनुभव  घेतल्याशिवाय कशी काय पूर्ण होईल ?

भारतातील पहिल्या क्रमांकाचे आणि जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे निमखार्‍या पाण्याचे चिलिका सरोवर , नंदनकानन , सिमलीपालसारखी अभयारण्ये , मंगलाजोडी – भितरकर्णीका यासारखे विविध जैववैविध्याने परिपूर्ण रामसर प्रदेश , ऑलिव्ह रिडले कासवांसाठी  प्रसिद्ध गहरीमाता समुद्र किनारा अशा आगळ्यावेगळ्या ठिकांणांना भेट देऊन तेथल्या वैविध्यपूर्ण प्राणी आणि पक्षी जीवनाचा आस्वाद घेताना आपण मंत्रमुघ्ध होतो.

खार्‍या पाण्याचा अथांग जलाशय – चिलिका सरोवर

निमखार्‍या पाण्याच्या सरोवर प्रकारामधिल जगातील दुसर्‍या क्रमांकावर असणारे प्रसिद्ध चिलिका सरोवर आणि चिलिका सरोवराचा एक भाग असणारे मंगलाजोडी हे  येथिल एक मुख्य आकर्षण आहे. खाऱ्या पाण्याचा हा अथांग जलाशय  तसेच या जलाशयामध्ये जवळपास 6 कि.मी आतमध्ये एका छोट्या बेटावर असणार्‍या कालीजाई देवीच्या मंदिराला भेट देताना बोटीमधून केलेला जवळपास एक तासाचा प्रवास आणि त्या प्रवासामध्ये दर्शन देणारे इरावदी डॉल्फीन या दुर्मिळ जातीच्या डॉल्फीनचे दर्शन  घेण्यासाठी  देश विदेशामधुन असंख्य पर्यटक येथे भेट देत असतात.

सातपाडा हे तीन बाजूंनी पूर्णपणे पाण्याने वेढलेले नयनरम्य पक्षी अभयारण्य हा चिलिका सरोवराचा एक भाग आहे . या ठिकाणी एखादा दिवस राहून नौकाविहार करावा, पक्षीनिरीक्षण करावे, आवडत असल्यास ताज्या मासळीचा आस्वाद घ्यावा आणि ताजेतवाने होऊन परतावे . येथिल जवळपास ४५ टक्के पक्षी हे जमिनीवर राहाणारे, ३२ टक्के पक्षी पाण्यात राहाणारे आणि २३ टक्के पक्षी हे बगळ्यासारखे लांब पायांचे, पाणथळ जागी राहाणारे असतात. चिल्का सरोवर १४ जातींच्या शिकारी पक्ष्यांचे निवासस्थान आहे. दुर्मिळ आणि धोक्यात आलेल्या इरावद्दी प्रजातीचे डॉल्फीन इथे आढळले आहेत. त्याशिवाय इथे सरपटणार्‍या प्राण्यांच्या आणि उभयचरांच्या ३७ प्रजाती आढळतात.  सूक्ष्मशैवाल, समुद्री लव्हाळी, समुद्री गवत, मासे, खेकडे या सरोवराच्या निमखार्‍या पाण्यात फोफावतात. त्यामुळे चिल्काला पर्यावरणाच्या दृष्टीने असामान्य महत्त्व प्राप्त झाले आहे. स्थलांतर करणार्‍या पक्ष्यांसाठी भारतीय उपखंडातील सर्वात मोठे असे हिवाळी आश्रयस्थान असणारे चिल्का हे पक्षी अभयारण्य म्हणूनही घोषित केले गेले आहे .

नंदनकानन प्राणीसंग्रहालय

 प्राणीसंग्रहालय म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मरतुकडे आणि गलितगात्र झालेले छोट्याश्या पिंजर्‍यामध्ये कोंदलेले प्राणी असे चित्र डोळ्यांसमोर येते. नंदनकानन हे अतिशय नावाजलेले , स्वच्छ आणि प्राण्यांसाठी मोठा परिसर आणि मोकळी हवा असणारे ओडिशामधिलच नव्हे तर आपल्या देशामधील एक सर्वशृत असे प्राणिसंग्रहालय भुवनेश्वरपासून फक्त १८ कि.मी वर अंतरावर असुन  पांढरा वाघ, सिंह, पट्टेरी वाघ, अस्वले, हरीण, चितळ, सांबर, जिराफ, झेब्रा असे अनेक वैविध्यपूर्ण प्राणी आपल्याला खूप जवळून या ठिकाणी पाहता येतात. अस्वले तर कधीकधी पुढचे दोन पाय आपल्या गाडीला टेकवून आत डोकावून पाहतात. अनेक देशविदेशांमधुन स्थलांतर करुन येणारे पक्षी बघण्यासाठी नंदनकानन हा एक उत्तम पर्याय आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांचे एक छोटेसे दालनही येथे आपण पाहू शकतो.

भितरकर्णिका अभयारण्य

जगातील खारफुटी प्रदेशामध्ये सुंदरबन खालोखाल आशिया खंडामधील दुसर्‍या क्रमांकावर असणारा आणि अत्यंत दुर्मीळ अश्या खार्‍या पाण्यामधिल अजस्त्र मगरींचा अधिवास असणारा ओरिसाच्या केंद्रपाडा जिल्ह्यामधिल अजुनही फारसा परीचीत नसलेला जवळपास 670 वर्ग कि.मी एवढा मोठा जैवविविधतेने नटलेला ओडिशामधिल एक प्रदेश म्हणजे  भितरकर्णिका राष्ट्रीय उद्यान . ब्राम्हणी – वैतरणी आणि धामरा या तीन नदीमुखालगतचा हा प्रदेश अजस्त्र अश्या मगरींचे निवसस्थान आहे . याच ठिकाणी जवळपास 5 प्रकारच्या किंगफ़िशर पक्षांचे दर्शन आपल्याला घडू शकते . फारसा परीचित नसल्यान आणि दुर्गम असल्यामुळे या ठिकाणी उच्च दर्जाच्या सोयी सुविधा मिळणे थोडे अवघड असते परंतु निसर्गसानिध्याची आवड असेल तर एक वेगळा अनुभव या ठिकाणच्या वास्तव्यामध्ये आपण नक्कीच घेऊ शकतो.

मंगलाजोडी

 देशामधील काही निवडक रामसर स्थळांमध्ये समावेश असलेले चिलिका सरोवराच्या उत्तरेस असणारे एक छोटेसे गाव . मंगलाजोडी या गावाबद्दल एक अतीशय अभिमानास्पद अशी गोष्ट म्हणजे या गावामध्ये प्रत्येक घरामधील कधी काळी परिसरामध्ये विशिष्ट हंगामामध्ये भेट देणार्‍या स्थलांतरीत पक्षांच्या शिकारीवर उदरनिर्वाह करणार्‍या फासेपारधी लोकांमध्येच जागृती निर्माण होऊन आज येथिल 100% रहिवासी चिलिका सरोवरआणि परिसरामध्ये स्थलांतर करून येणार्‍या जवळपास 300 प्रकारच्या स्थलांतरीत पक्षांचे संवर्धनच करीत नाहीत तर त्यामधुन त्यांना कितीतरी अधिक पटीने रोजगार निर्माण झालेला आहे . येथे येणार्‍या पर्यटकांना छोट्या डोंगा होडीमधून येथिल दलदल प्रदेशाची सफर घडवून स्थलांतरीत पक्षी जिवनाचा परिचय आणि दर्शन घडवणे हा येथिल एक प्रमुख व्यवसाय बनला आहे. वाल्या कोळ्याचा जसा वाल्मिकी झाला तसेच काहीसे शिकार्‍यांचा संवर्धक झालेला गाव ही एक अनन्यसाधारण घटना म्हणावी लागेल .

तसे बघायला गेले तर भारताचा राईस बाऊल अशी समर्पक ऒळख निर्माण केलेल्या या प्रदेशाची सफ़र करण्यासाठी आपल्याला एक महिनाही कमीच पडेल पण

आपल्या धकाधक्कीच्या आयुष्यामध्ये निवांतपणे निसर्गाच्या सनिध्यामधे देवेदेवतांच्या या पवित्र भुमीतून  आपले विमान परतीच्या प्रवासासाठी आकाशात झेपावल्यानंतर आपण  खिडकीतून बाहेर पाहिले तर मंदिरांच्या उंचच उंच शिखरांसोबत तेवढय़ाच उत्तुंग मनाची निरागस माणसेसुद्धा आपल्याला हात हलवून पुन्हा पुन्हा खुणावत असतात आणि जणू सांगत असतात

” ଆପଣଙ୍କୁ ଭେଟି ଭଲ ଲାଗିଲା . ମୋତେ ଭୁଲିବେ ନାହିଁ ” आपनकु भेटी भोला लागीला . मोटे भुलिबे नाही..

 

 

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!