7/12 वरील “तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार” हा शेरा निघणार : छोटे भूखंड विनाशुल्क नियमित करण्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

 

राज्यातील 60 लाख मालमत्ताधारकांसह 3 कोटी नागरिकांना होणार लाभ, राज्य सरकारचे निर्देश..

एकदा हे तुकडे नियमित झाले आणि खरेदीदाराचे नाव अधिकार अभिलेखात आले की, सदर जमिनीची पुन्हा विक्री करण्यास किंवा हस्तांतरण करण्यास भविष्यात कोणताही प्रतिबंध राहणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे.✅💯

वसई/मुंबई :- आशिष राणे
तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क, नियमित आणि कायदेशीर करण्यासाठी आवश्यक असणारी सविस्तर कार्यपद्धतीच आता राज्याच्या महसूल विभागाने निश्चित केली असून याबाबत सर्व प्रशासकीय यंत्रणेला छोटे भूखंड नियमित करण्याचे निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दि. 15 नोव्हेंबर 2025 रोजी जारी केले आहेत.

दुसरीकडे या अत्यंत महत्वाच्या निर्णयाचा राज्यातील 60 लाख कुटुंबांसह सुमारे 3 कोटी नागरिकांना फायदा होणार आहे. तर विशेष म्हणजे, “तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार” हा सातबाऱ्यावरील फार जुना शेरा आता या निर्णयामुळे काढून टाकला जाईल.
दरम्यान एकूण आठ मुद्द्यांच्या या कार्यपद्धतीने महाराष्ट्रातील अनेक वर्षापासून रखडलेला छोट्या जमिनीचा व्यवहार मात्र या निर्णयामुळे आता कायदेशीर होणार आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशावरून महसूल विभागाने याबाबतची कार्यपद्धती जारी केली असून,दि.15 नोव्हेंबर 1965 ते दि.15 ऑक्टोबर 2024 या कालावधीत झालेल्या जमीन व्यवहारांना लागू असणार आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी जमाबंदी आयुक्त भूमी अभिलेख नोंदणी महानिरीक्षकांसह विभागीय आयुक्तांकडे यासंदर्भात कार्यपद्धतीसंदर्भातील पत्र पाठविण्यात झाले आहे.

दि.3 नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील राजपत्र जारी करण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA), नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (NMRDA) यांसारख्या नियोजन प्राधिकरणांच्या क्षेत्रातील निवासी/वाणिज्यिक झोन, छावणी क्षेत्रातील जमिनी, प्रादेशिक आराखड्यात अकृषिक वापरासाठी दर्शविलेले क्षेत्र आणि गावठाणांच्या हद्दीलगतचे ‘पेरीफेरल एरिया’ क्षेत्र यामध्ये समाविष्ट आहे.

सातबाऱ्यावर नाव लागणार-
अनेकदा गुंठेवारीने घेतलेल्या जमिनींची नोंद ‘तुकडेबंदी’ कायद्यामुळे सातबारा उताऱ्यावर होत नव्हती किंवा झाल्यास ती ‘इतर हक्कात’ होत असे.

आता या निर्णयामुळे :
फेरफार रद्द झाला असल्यास : जर यापूर्वी खरेदीचा फेरफार रद्द झाला असेल, तर तो पुन्हा तपासून मंजूर केला जाईल आणि खरेदीदाराचे नाव कब्जेदार म्हणून लावले जाईल.

इतर हक्कात नाव असल्यास : ज्यांचे नाव सध्या सातबाराच्या ‘इतर हक्कात’ आहे, त्यांचे नाव आता मुख्य ‘कब्जेदार’ सदरात घेतले जाईल.

शेरा कमी करणे : “तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार” असा जर काही शेरा सातबाऱ्यावर असेल, तर तो काढून टाकला जाईल.

अनोंदणीकृत व्यवहारांसाठीही मोठी संधी-
ज्यांनी फक्त नोटरी किंवा स्टॅम्प पेपरवर व्यवहार केले आहेत आणि दस्त नोंदणीकृत नाहीत, अशा नागरिकांना तलाठी व मंडळ अधिकारी दस्त नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करतील.

मुद्रांक शुल्क भरून दस्त नोंदणी केल्यानंतर त्यांचीही नावे सातबारावर लावली जातील.

पुढील विक्रीचा मार्ग होईल मोकळा-

एकदा हे तुकडे नियमित झाले आणि खरेदीदाराचे नाव अधिकार अभिलेखात आले की, सदर जमिनीची पुन्हा विक्री करण्यास किंवा हस्तांतरण करण्यास भविष्यात कोणताही प्रतिबंध राहणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शहरी आणि निमशहरी भागात वास्तव्यास असलेल्या मध्यमवर्गीय भूखंडधारकांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या मालमत्तेला आता कायदेशीर हक्क प्राप्त होणार आहेत.

तुकडेबंदीचे व्यवहार नियमित करण्यासाठी जमिनीच्या चालू बाजारभावाच्या 25 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागत होती, नंतर ती 5 टक्के करण्यात आली. मात्र,

तरीही नागरिक पुढे येत नसल्याने आता शासनाने कोणतेही मूल्य न आकारता हे व्यवहार नियमित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याचा 60 लाख कुटुंबे म्हणजेच राज्यातील सुमारे 3 कोटी नागरिकांना लाभ होईल.

 

 

 

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!