Maharashtra Co-operative Awards : सहकारी संस्थांना राज्यशासन देणार सहकार पुरस्कार ! पालघर जिल्ह्यातील सहकारी संस्थाना जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन

“सन २०२५ हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी “आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष” म्हणून घोषित केले आहे. या वर्षात, सहकारी संस्थांची समाजाच्या विकासातील प्रमुख भूमिका आणि योगदान यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाईल असे बैठकीत निश्चित झाल्यावर आज जगभर सहकाराचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत आपल्या ही देशात खास करून महाराष्ट्र राज्य हे सहकाराचे एक प्रमुख अंग व स्रोत आहे असे जरी असले तरी २०२३-२४ या आर्थिक वर्षात पुरस्कार जाहीर करण्या अगोदर प्रस्ताव सादर करण्याऱ्या सहकारी संस्थाच्या कामगिरीचे ही मूल्यमापन होणार आहे,
त्यानुसार “महाराष्ट्र राज्यातील सहकार क्षेत्रातील कार्यरत संस्थांना गौरविण्यासाठी ‘सहकार महर्षी’, ‘सहकार भूषण’ आणि ‘सहकार निष्ठ’ या गटांत एकूण ४५ संस्थांची निवड होणार असून, प्रस्ताव पाठवण्याची अंतिम तारीख १८ जुलै असणार आहे.”

वसई :- आशिष राणे ( खास सहकार वृत्त)

सन २०२५ आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष म्हणून घोषित केल्यानुसार राज्याच्या सहकार चळवळीच्या विकासात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या सहकारी संस्थांना यंदाच्या वर्षी राज्य शासनामार्फत सहकार पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.


त्यासाठी सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील कामगिरीच्या आधारावर सहकारी संस्थांची निवड करण्याचा कालबद्ध कार्यक्रम शासनाकडुन नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
यासाठी पालघर जिल्ह्यातील आठही तालुक्यातील सहकारी संस्थांनी दि १८ जुलै २०२५ पर्यंत संबंधित तालुका सहायक निबंधक, उपनिबंधक कार्यालयाकडे रितसर प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन पालघर जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी यांनी केले आहे.
दरम्यान पात्र संस्थांच्या निवडीसाठी संस्था प्रकारनिहाय नोंदणी, वार्षिक सर्वसाधारण सभा, संचालक मंडळ सभा, नफा-तोटा, थकबाकी, संस्थेवरील कायदेशीर कारवाई, लेखापरीक्षण, व दोषदुरुस्ती अहवाल, निवडणूक, व्यवस्थापन, निधीची गुंतवणूक, प्रशिक्षण, सादर करावयाची प्रतिज्ञापत्रे यासाठी ५० गुण, संस्था प्रकारनिहाय निश्‍चित केलेल्या विशेष निकषांसाठी ३५ गुण व सहकारी संस्थेसाठी योगदान,जनतेसाठी दिलेले योगदान, सहकार चळवळीच्या विकासासाठी प्रयत्न, सहकारी, सार्वजनिक, धर्मादाय प्रयोजनासाठी केलेली मदतीसाठी २० गुण देण्यात येणार आहेत.
शासन स्तरावरील समितीमार्फत २६ सप्टेंबरपर्यंत पुरस्कार प्राप्त संस्थांची अंतिम निवड करण्यात येणार आहे.

असे आहे सहकार पुरस्काराचे स्वरूप
या पुरस्कारांतर्गत ‘सहकार महर्षी’ पुरस्कार-१, ‘सहकार भूषण’- २१ तसेच ‘सहकार निष्ठ’- २३ असे एकूण ४५ संस्थांना पुरस्कार देण्यात येणार असून, अनुक्रमे रुपये १ लाख, रुपये ५१ हजार व २५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या सर्व पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव आमंत्रित
पुरस्काराविषयी अधिक माहिती सहकार विभागाच्या http://sahakarayukta.maharashtra.gov.in

या संकेतस्थळावर तसेच सर्व जिल्हा उपनिबंधक, तालुका उपनिबंधक, सहायक निबंधक यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणी झालेल्या इच्छुक सहकारी संस्थांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्ह्यातील त्या त्या तालुक्याच्या संबंधित सहाय्यक किंवा उपनिबंधक कार्यालयात दाखल करावेत, असे आवाहन सहकार विभागामार्फत करण्यात आले आहे.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!