पावसाळा सुरू झालाय व सध्या मासेमारी बंदीचा काळ सुरु झाला आहे त्यात गाबोळी भरलेले हे मासे चवदार असल्याने चिवणी मासा लोकप्रिय मानला जातो सहाजिकच मासळीप्रेमींची त्याला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते आहे.
वसई / खानिवडे वृत्त :-
सध्या पावसाचा मोसम सुरू झाला असून या मोसमात समुद्र खवळलेला असल्याने खोल समुद्रातील मासेमारला बंदी आहे. बंदीकाळ असल्याने बाजारातील समुद्री माशांची आवक मात्र प्रचंड
घटली आहे याला पर्याय म्हणून वसईच्या बाजारात सध्या खाडी आणि ओहळांतील वलग्नीच्या म्हणजेच चढणीच्या माशांचा पर्याय उभा राहिला आहे. हे मासे पकडून लागलीच बाजारात येत असल्याने ते ताजेच मिळत आहेत . त्यामुळे बहुतांश मासळी बाजारांत मासळीप्रेमी चढणीच्या माशांचा घमघमाट अनुभवत आहेत.
पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रवाहित होणाऱ्या ओहोळ ,नाल्यांमध्ये प्रवाहाच्या विरुद्ध चढणाऱ्या गोड्या पाण्यातील माशांना पालघर जिल्ह्यात वलग्नीचे मासे म्हणून संबोधले जाते.काही ठिकाणी ह्या माश्यांना चिवणी चे मासे , चढणीचे मासे असेही म्हणतात . सध्या हे मासे मोठ्या प्रमाणात विक्रीला येत आहेत. जून ते ऑगस्ट दरम्यान राज्य शासन समुद्रातील मासेमारीवर बंदी घालते.
हा काळ मत्स्य प्रजननासाठी राखीव असतो. बंदी काळात समुद्रात मासेमारी करणे कायद्याने गुन्हा मानला जातो. त्यामुळे सध्या बाजारात समुद्रातील मासळी मिळेनाशी झालेली आहे. त्यामुळे खाडी, नद्या ,नाले आणि ओहळांतून मिळणाऱ्या माशांची मागणी मोठी आहे.
वसईतील ग्रामीण भागात पहाटेपासूनच मासेमारीसाठी हालचाल सुरू होते. गाव पाड्यांतील पुरुष व महिला पाग , झोळणे , लाकडी तोंड्या, भुसा व पारंपरिक गळांच्या साहाय्याने नदी-नाल्यांतील मासे पकडत आहेत. ही मासळी बाजारात किंवा घरोघरी विक्रीसाठी नेत असल्याने त्यांच्या उत्पन्नाचा मार्गही खुला झाला आहे.
गाबोली भरलेले हे मासे चवदार असल्याने चिवणी मासा लोकप्रिय मानला जातो. साहजिकच मासळीप्रेमींची त्याला पसंती आहे. चिवणीचे वाटे दोनशे ते पाचशे रुपयांना विकले जात आहेत साहजिकच मासळीप्रेमींची त्याला मोठ्या प्रमाणावर पसंती राहिली आहे.
![]()
