
नवी मुंबई/वसई : –
राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांचा अभ्यासगट मागील आठवड्यात गठीत करण्यात आला होता.
दरम्यान या महत्त्वाच्या अभ्यासगटाची दुसरी बैठक शुक्रवारी सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली.

या बैठकीत अभ्यास गटाचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्यासह वसई विरार पालघर जिल्हा समन्वयक तथा वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित, नवी मुंबईचे आयुक्त कैलास शिंदे, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रतिनिधी म्हणून नगररचना उपसंचालक शिवा रेड्डी, तसेच आयएएस अधिकारी, कोकण विभागातील महानगरपालिका (ठाणे, नवी मुंबई, पनवेल, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, मीरा-भाईंदर), अंबरनाथ व बदलापूर नगरपरिषद, तसेच सिडको, म्हाडाचे अधिकारी आदी आवर्जून उपस्थित होते.
या बैठकीत शासनाच्या २०१९ शासन निर्णयाच्या अंमलबजावणी बाबत आढावा झाला.
यावेळी विविध अधिकाऱ्यांच्या सूचना घेण्यात आल्या तसेच येणाऱ्या अडचणींवरती सविस्तर चर्चा ही झाली. नवी मुंबईतील महापालिका व सिडको मधील समन्वयाची गरज, ओसी (भोगवटा दाखला ) किंवा सीसी (बांधकाम परवानगी ) नसलेल्या इमारतींचे स्वयंपूर्ण विकासातील अथवा जीर्ण- मोडकळीस आलेल्या इमारतींचा स्वयंपूर्ण विकास आणि ज्या सवलतींवर अंमलबजावणी झाली नाही त्याबाबत करावयाची कार्यवाही याबाबत आम.दरेकर यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रामुख्याने नवी-मुंबईमधील तीन सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी त्यांच्या स्वयंपुनर्विकासातील येणाऱ्या अडचणी विषद केल्या. या बैठकीला ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, मुख्य अधिकारी ही बैठकीला उपस्थित होते.
किंबहुना ठाणेकरांनी मुंबई बँकेचे अनुकरण करून त्याच प्रकारे ठाणे जिल्ह्यामध्ये ही ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने काम करावे असेही बैठकीच्या शेवटी आम. दरेकरांनी यांनी सांगितले.
![]()
