वसई – वार्ताहर
आपलं घर’ ही संकल्पना घेऊन ऑस्ट्रेलिया-सिडनी स्थित महाराष्ट्रीयन आणि वसईकरांनी एकत्र येत मराठी संस्कृती,भाषा आणि परंपरांचा जागर करण्यासाठी शनिवारी चे
रीब्रुक सांस्कृतिक-सामुदायिक केंद्र येथे मोठ्या उत्साहात मेळाव्याचे आयोजन केले होते. सिडनीमध्ये वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रीयन (ज्यात वसईकरांचा अधिक समावेश आहे.) संघटनेतील सक्रिय सदस्यांनी संध्याकाळी स्वागत कक्षातील विविध खेळ आणि फोटो सेशन्समुळे वातावरण रंगतदार केले होते. तद्नंतर सूत्रसंचालिका सविता फरेरा आणि नुरिया घोन्साल्विस यांनी या मेळाव्याच्या उद्देशाबद्दल सविस्तर माहिती दिली.ऑस्ट्रेलियात वसलेल्या आपल्या पाल्यांना भेटण्यास आलेल्या २० पालकांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला.यावेळी पीटर डिकॉस्टा यांनी प्रस्तावनेत अशा प्रकारच्या पारंपरिक मेळाव्यांचे महत्त्व अधोरेखित केले.अशा प्रकारच्या मेळाव्यामुळे सिडनीसारख्या नव्या ठिकाणी आपलेपणाची आणि आपल्या गावी असल्यासारखी नक्कीच जाणीव होईल.असेही ते यावेळी म्हणाले.वसईकरांच्या १५० हून अधिक उल्हासित समूहाने स्वागतनृत्य करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
तद्नंतर वसई धर्मप्रांताचे नवनियुक्त महागुरू बिशप थॉमस डिसोजा यांनी आपल्या व्हिडिओ संदेशाद्वारे,असे कार्यक्रम आयोजित करून आणि आपल्या लोकांना त्यांच्या अडचणींमध्ये सहकार्य करून वसई संस्कृती जपण्याची गरज अधोरेखित केली.यावेळी पारंपरिक लग्नगीतांच्या संगीताच्या ठेक्यावर ईस्ट इंडियन साड्यांमध्ये नटलेल्या महिलांच्या नृत्याने वातावरण भारावून टाकले.त्याच वातावरणात ग्लेन डिसोझा आणि मिस पारू यांनी पारंपरिक वेशभूषेत कोळी नृत्य सादर केले.
हा सिडनी वसईकर मेळावा म्हणजे परदेशात राहूनही आपली संस्कृती,आपली भाषा आणि आपले बंध जपण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे. आपली पारंपरिक मूल्ये नव्या पिढीमध्ये रुजू होतील आणि आपापसात एकजुटीने राहता येईल.असे यावेळी लेखक रेमंड मच्याडो यांनी स्पष्ट केले.पीटर डिकॉस्टा,डॉमिनिक डिसोजा,ग्रॅनवील मच्याडो,सविता फरेरा,नुरिया घोन्साल्वीस,विल्यम डिसिल्वा,लता रिबेलो,अॅलन फरेरा यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.संस्थेचे झिको घोन्साल्वीस यांनी आभार मानले.
![]()
