आजच्या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता सर्वांनाच आवश्यक झाले आहेत. मुक्त आणि शहरी गोंगाटापासून लांब स्वच्छंदपणे दोन दिवस निसर्गाच्या विविध रुपांचा आस्वाद घेत भटकण्याची अनामिक ओढ आणि धकाधकीच्या रोजच्या आयुष्यामधे निवांत वेळ काढुन दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. साधारण दिवाळी संपली की सर्वाना भटकंतीचे वेध लागतात. पर्यटनाच्या दृष्टीने हा ऋतू सर्वोत्तम असतो. गुलाबी थंडी, आल्हाददायक वातावरण, धुक्याची दुलई यामुळे या दिवसांत फिरण्याची मजा काही औरच! उन्हाचा त्रासही जाणवत नाही आणि दमछाकही होत नाही. अशा वेळी जवळच्या पण गर्दी नसलेल्या ठिकाणांचा शोध सुरू असतो. ठिकाणाची निवड अचूक असेल तर भटकंतीचा आनंद द्विगुणित होतो. सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल , किर्र घनदाट जंगल , प्रखर उन्हालाही जंगलात दबकत… दबकत उतरावे लागावे अशी झाडी , घनदाट झाडीमधुन येणारे पक्षी आणि प्राण्यांचे चित्र विचित्र आवाज . मुक्त आणि शहरी गोंगाटापासून लांब स्वच्छंदपणे दोन दिवस निसर्गाच्या विविध रुपांचा आस्वाद घेत भटकण्याची अनामिक ओढ सर्वसामान्य पर्यटकाला शहरापासून बाहेर परंतु शक्यतो जवळ असणार्या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी प्रेरित करते. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेकविध आश्चर्यांनी नटलेली अनेक ठिकाणे आपल्याला नेहमीच खुणावत असतात.
१ ऑगस्ट २०१४ रोजी सागरी-डोंगरी आणि नागरी अंग असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन, एकुण सात जिल्ह्यांचा समावेश असणार्या कोकण प्रांतामधिल कोकण सखल प्रदेशाचा उत्तर भाग असणारा वेगळा झालेला पालघर हा महाराष्ट्र राज्यातला ३६वा जिल्हा . आपल्या देशात सर्वात जास्त सुमारे ११२ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला पालघर हा एकमेव जिल्हा आहे. पालघर जिल्हा ठाणे जिल्हयापासुन 52 कि.मी. आणि मुंबईपासुन 74 कि.मी. अंतरावर आहे. पूर्वेकडे असणार्या सहयाद्री पर्वताच्या रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राची किनारपट्टी या दरम्यान हा जिल्हा पसरला आहे. जव्हार, डहाणू, तलासरी, पालघर, मोखाडा, वसई, वाडा, आणि विक्रमगड या तालुक्यांचा समावेश असणार्या पालघर जिल्हयाच्या पुर्वेला सहयाद्री पर्वताच्या रांगा आणि पश्चिमेला अथांग असा समुद्र त्याचप्रमाणे जंगल, डोंगर कपारींनी हा जिल्हा समृध्द आहे. जिल्हयातील घोलवड – डहाणु येथील चिक्कु , वसईची केळी आणि फुलांच्या बागा सर्वत्र प्रसिध्द आहेत. धोडिया, कोळी महादेव, दुबळा, कोळी मल्हार, कोकणा, कातकरी आणि वारली समाज या आदिवासी समाजाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असणारा जिल्हा अशी ओळख जिल्ह्याला लाभलेली असून डहाणु हा तालुका वारली आदिवासींच्या तारपा नृत्य आणि त्यांच्या वारली चित्रकलेमुळे जगभर प्रसिध्द आहे. जिल्ह्य़ातील लक्षणीय फलोत्पादन , जिल्ह्याच्या पुर्वेकडे निसर्गसंपत्तीने नटलेल्या सह्याद्रीच्या असणार्या डोंगररांगा , शहापूर, वाडा आणि पालघर तालुक्यातून वाहणारी वैतरणा नदी आणि उत्तरेकडील डोंगराळ वैतरणा खोरे , जव्हार पॅलेसच्या शाही आकर्षणापासून ते अर्नाळा किल्ला, वसईचा किल्ला आणि गंभीरगड, तारापूर, कलादुर्ग आणि केळवा यांसारख्या वैचित्र्यपूर्ण किल्ल्यांच्या समूहापर्यंत नैसर्गिक चमत्कारांनी युक्त असणारी जिवदानी -वज्रेश्वरी – गणेशपुरी सारखी धार्मिक ठिकाणे , संस्कृतीचा वारसा जपणारी असंख्य ठिकाणे , जागतिक स्तरावर ठसा उमटवलेली वारली चित्रकला आणि निर्मनुष्य गेटवे यांचे आकर्षक मिश्रण लाभलेल्या आपल्या या जिल्ह्य़ात पर्यटन विकासाला भरपूर वाव आहे.
निसर्ग आणि पर्यटन याचा विचार करावयाचा झाल्यास पालघर जिल्हा हा अत्यंत निसर्गसंपन्न परंतु दुर्लक्षित असा जिल्हा. काही मोजक्या ठिकाणांचा अपवाद वगळला तर पर्यटन दृष्ट्या अनेक अपरिचित आणि अनवट ठिकाणांची देणगी पालघर जिल्ह्याला लाभली आहे. त्यातीलच काही ठिकाणांचा मागोवा घ्यायचा हा छोटासा प्रयत्न.
जव्हार तालुका
जव्हार हा खरंतर महाराष्ट्रातला दुर्लक्षित,दुर्गम असा भाग. जव्हार तालुक्यामधिल शहरी गजबजाटापासून दूर असणार्या अनेक ठिकाणांना वर्षातुन कधीही भेट देता येते परंतु येथे भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी म्हणजे पावसाळा आणि त्या नंतरचा काही काळ . धुवाधार पावसामध्ये न्हाऊन निघालेल्या या भुमीचे सौंदर्य या वेळी काही औरच असते. पण पावसाळ्याच्या दिवसात इथलं वातावरण अक्षरश: वेड लावणारं असतं. थंड हवा, तुफान कोसळणारा पाऊस, उंचावरून कोसळणारे धबधबे, प्रचंड असं धुकं.. आहाहा आल्हाददायक असा अनुभव. जव्हारपासुन जवळपास मोखाडा, सुर्यमाळ, खोडाळा यांसारखी लहान लहान हिल स्टेशन्स् पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.
हनुमान पॉईंट
फेसाळत्या पाण्याचे धबधबे, हिरवीगार वनराई हे अनुभवायचं असेल तर याहून सुंदर दुसरी जागाचं नाही. जव्हारमध्ये प्रवेश करताच अंदाजे ४०० मीटर्स खोल असलेली नारळीदरा ही दरी पहायला मिळते. या दरीत अनेक धबधबे वाहतात. जव्हारचा हनुमान पॉईंट तर प्रसिद्धचं आहे. कात्या मारुती मंदिर म्हणून ओळखले जाणार्या या ठिकाणी उभं राहून सभोवताली नजर टाकल्यास निसर्गाच्या प्रेमात पडला नाहीत तरचं नवल . शिवकालीन शहापूर माहुलिच्या किल्याचे अत्यंत विहंगम दृष्य या टिकाणाहुन आपल्याला पाहता येते .आपल्या नविन कॅमेर्यावर प्रयत्न करण्यासाठी एक उत्तम ठिकाण म्हणून हनुमान पॉइंट हे सूर्योदय बिंदूचे संपूर्ण पॅकेज आहे, हे आजूबाजूला दरी आणि उच्च टेकड्यांनी वेढलेले आहेजयविलास पॅलेस
जव्हारमधील मुख्य आकर्षण म्हणजे हा पॅलेस. हा राजवाडा खासगी मालमत्ता असला तरी त्याच्या भव्यतेवरून त्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात येते. राज्याची सुंदर तैलचित्रे, जुने दुर्मिळ फर्निचर आणि अन्य वस्तू येथे जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. या राजवाड्यात अनेक मालिका आणि सिनेमांच शुटिंग झालंय.दाभोसा धबधबा
जव्हारचं मुख्य आकर्षणचं दाभोसा धबधबा हे आहे. तुफान वेगाने या धबधब्यातील पाणी जमीनीवर कोसळत असते. या धबधब्यातल्या पाण्याचे तुषार सुमारे १०० फुट उंच उडतात यावरूनचं पाण्याला असणा-या वेगाची कल्पना येऊ शकते. या ठिकाणी अलीकडेच बांधण्यात आलेलं खडखड धरण लोणावळ्यातला भुशी डॅमची आठवण करून देते.बाणगंगा
जुन्या राजवाड्याजवळ असलेले श्री मुक्तेश्वर महादेव मंदिराजवळील एका जिवंत झ-याला बाणगंगा या नावाने ओळखले जाते व म्हणूनचं या मंदिराला बाणेश्वर महादेव मंदिर म्हणूनही ओळखले जाते. संस्थान काळात स्वत: राजे दर शिवरात्रीला महादेवाची पुजा बांधत असतं.कालांतराने इतर मंदिरांसह देवस्थान समितीकडे हे मंदिरही सुपूर्त केले. २००१ साली नागरिकांच्या सहकार्यातून या मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला. महाशिवरात्री, त्रिपुरारी पौर्णिमा, होळी हे उत्सव या मंदिरात आजही भक्तीभावाने साजरे केले जातात. या मंदिरासमोरचं असलेल्या वृक्षाच्या ढोलोतील खोडाला गणपतीच्या सोंडेचा आकार आल्याने या वृक्षासमोरून जाताना निसर्गाची ही किमया पाहायला पावले आपोआपच थांबतात.काळमांडवी धबधबा
जव्हार शहराच्या दक्षिणेस 8 कि.मी. अंतरावर आकर्षक काळमांडवी धबधबा आहे. ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि रॅपेलिंग यासारख्या साहसी खेळांसाठी या खडकाळ प्रदेशात एक परिपूर्ण जागा आहे. हा धबधबा १०० मी. खोल आहे या धबधब्याचा एक चमत्कारिक गुण म्हणजे तो वर्षभर वाहतो.हिरडपाडा धबधबा
जव्हारमधील १०९ गावांपैकी धबधब्यासाठी प्रसिद्ध असणारे हिरडपाडा हे गाव . गावापासून फक्त ०.५ किमी अंतरावर असणारा धबधबा आणि मूळ आदिवासींच्या अनोख्या ढोल नृत्य, तर्पा नृत्य आणि वारली चित्रकला या मुळॆ हे गाव हळूहळू लोकप्रीय होते आहे.सेंट पीटर चर्च
ही चर्च 20 व्या शतकाच्या उत्तरार्धात तयार केली गेली होती आणि बॉम्बेच्या आर्किडिओसिस अंतर्गत येणारी ही पहिली होती. फ्र. इस्माईल दा कोस्टा यांनी 1919 मध्ये अर्नाळा किनारयाजवळ झोपडी बांधले. नंतर सर्व धर्मातील स्थानिक लोकांच्या मदतीने त्याने सेंट पीटर चर्च तयार केले. मुख्य बिशप जोकॅकिम लीमा (बॉम्बेचे मुख्य बिशप) यांनी 27 डिसेंबर 1931 रोजी चर्चला आशीर्वाद दिला. शेजारच्या इतर ऐतिहासिक चर्च सेंट सेंट जेम्स चर्च (आगाशी) आणि चर्च ऑफ होली स्पिरिट (नंदाखल) आहेत.शिरपामाळ
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिरपामाळ हे ठिकाण महाराज सुरतेवर स्वारीसाठी जात असतांना त्यांनी येथे आपल्या मावळयांसह काही काळ केलेल्या विसाव्यामुळे प्रसिद्धिस आले आहे
जव्हारचे संस्थानिक ” विक्रमशहा ” यांनी महाराजांचे त्यावेळी या ठिकाणी स्वागत केले होते त्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासीक असे महत्व प्राप्त झाले आहे.डहाणू तालुका
पालघर जिल्हयातील एक आदिवासी बहुल आणि मुख्यत्वे डोंगरी व सागरी भागात वसलेला तालुका अशी ओळख असलेला तालुका म्हणजे डहाणू . जवळपास 980.50 चौ.की.मी. क्षेत्रफळ असलेल्या या तालुक्याच्या उत्तरेस तलासरी तालुका व गुजरात राज्याची सीमा, दक्षिणेस पालघर तालुका, पुर्वेस जव्हार व विक्रमगड तालुका व पश्चिमेस अरबी समुद्र आहे. पुर्वेस डोंगराळ व आदिवासी भाग विखुरलेला असून पश्चिमेस समुद्रकिनारपट्टी आहे. पर्यटनाच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास रस्ता आणि लोहमार्ग या दोन्ही दळणवळणाच्या मार्गाची उपलब्धता आणि पालघरजवळ येणारा नियोजित विमानतळ या मुळे प्रवासासाठी सुलभ अश्या सोयीनी युक्त या प्रदेशामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत .
आजही काही अपवाद सोडल्यास अनेक अनवट ठिकाणे तालुक्यामध्ये आहेत .
बराडगड अथवा बार्डाचा दुर्ग .
डहाणू – बोर्डीच्या समुद्रा पासून हाकेच्या अंतरावर पण चहुबाजवांनी रानाने वेढलेला दुर्ग म्हणजे “बारडगड ”
मुंबई – अहमदाबाद मार्गावरील धुंदलवाडी गाठून इथं डावीकडे वळत आंबेसरी आणि पुढे गांगणगावच्या पाटील पाड्यातून डोगर चढाईला सुरुवात करावी. अदमासे दिड तासात गडमाथा गाठता येतो.बोरीच्या माळातून वर आल्या नंतर उडत्या वारूचे ( घोड्याचे ) एका मोठया शिळेवर चित्ररूपाने देवस्थान पाहायला मिळते .पुढे देवीचे मंदिर आणि पुढे दगडावर वाघोबाचे चित्र दृष्टीस पडते.थोडं पुढे चालून आले की देवीचे अजुन एक मंदिर आणि दगडावर देवीचा मुखवटा चित्र रूपाने पहावयास मिळतो .ह्या सर्व देव – देवतांचा वास या डोगरावर गेली कित्येक सालापासून आहे असे इथले आदीवासी सांगत आहेत. हे सरं पाहून झालं की अलगदत इतिहासाच पान उघडत ते इथल्या गुंफांच आणि पाण्याच्या टाक्याच्या शृंखला बघताना. हे असं आपसुकच उघडलेल इतिहासच दालन पाहताना आश्चर्य वाटत ते इथले स्थानिक आणि फक्त पिकनिक म्हणुन येणारे डहाणू – तलासरी कडील लोकांना इथं पर्यंत येऊनही हे एखादं दुर्ग शिल्प आहे हे न जाणल्या मुळेच. इथल्या पाण्याच्या खोदीव टाक्या, तटा साठी चिरे उपसलेल्या जागा आणि इथलं खांब टाकं पाहताना सातवाहन काळाची आठवण झाल्याखेरीज राहत नाही. इथलं देवीचं भुई घर म्हणजे तीन खांबावर असलेली गुहा, यातील सध्या दोन खांब तुटलेले आहेत, आत उतरण्यासाठी पायऱ्यांची माळ तुटवलेल्या अवस्थेत आहे, उजव्या बाजुला एक पाण्याच टाकं पण दुरावस्थेत आहे. इथल्या खांब टाक्यातील पाणी पिण्यालायक आहे बाकी एकूण एक सर्वच टाक्या कोरड्या आहेत, थोडंस वरच्या झाडोऱ्यात फिरताना तटाचे आणि तटबंदी असल्याचे दाखले देणारे बांधकाम मूक उसासे घेत असल्याचे जाणवते, तटबंदी बऱ्याच अंशी शाबूत आहेच पण इथं एक दरवाजा दुरावस्थेत आहे, दरवाज्यात चार दोन पायऱ्यांचा उतार आणि कधीकाळी असलेली कमान आता दगडांच्या राशीत एकजीव झाल्याच कळते. एखादं द्वारशिल्प इथं असावं असे मनी वाटून जात.बारडाची लेणी अथवा बहरोट लेणी या बौद्ध भिक्खुंनी उत्खनन केलेल्या बौद्ध लेणी याच बारडाच्या डोंगरामध्ये आहेत . भरदाणा’ या नावाने ओळखले जाणारे भारतातील एकमेव पारशी/झोराष्ट्रियन गुंफा मंदिर या ठिकाणी डोंगरामध्ये आहे.
इ.स. १३९३ साली मुहम्मद बिन तुघलक आणि अलाफ खान यांनी संजन (आजचा संजान) येथील भिक्खूंच्या आश्रम स्थानावर आक्रमण केल्यानंतर, ते या पर्वतांमध्ये १३ वर्षे लपून बसले होते. या काळात (१३९३ – १४०५) ‘इरानशाह ज्योत’ हलविण्यात आला. आजही, पवित्र अग्नि जळत आहे आणि जगातल्या समर्पित अग्नीचा सर्वात प्रतिष्ठित दर्जा दिला जातो.(वलसाड उड़वाडा येथे पारशी अग्यारा देवळात पवित्र अग्नि ज्योत पाहण्यास भेटेल) बहरोट गुंफांना जागतिक वारसा स्थळ घोषित केले गेले असुन भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण ASI च्या अंतर्गत हे एक संरक्षित स्मारक आहे .बोर्डी समुद्र किनारा :
महाराष्ट्र राज्याच्या गुजरातलगत किनारपट्टीवरील बोर्डी समुद्र किनारा हा नितांत रमणीय सागरी किनारा आपल्याला एका अस्सल ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवतो. डहाणू आणि घोलवड सोबतच चिकूसाठी प्रसिध्द असलेल्या बोर्डीने वारली आदिवासीं बरोबरच पारशी समाजही आपल्यात सामावून घेतला आहे. पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असल्याने हे गाव हरितक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे इथे शहरीकरणाची छाप नाही. माणसांचे अतिक्रमण नसल्याने बोर्डीचा हा नैसर्गिक किनारा आजही आपल्याला भुरळ पाडतो. किनाऱ्यावर येऊन धडकणाऱ्या, फेसाळणाऱ्या लाटांची लहर आपल्याला मंत्रमुग्ध करते. सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळी मासेमारी करून परतणाऱ्या होड्या पाहणे आणि बाजारात त्याच ताज्या मासळीची खरेदी करणे ही इथली मेजवानीच. त्यातही येथील कृषी पर्यटन केद्रात राहण्याचा अनुभव घेता येणं म्हणजे दुग्धशर्करा योगच!अस्वाली डॅम, फाँरेस्ट गार्डन, नरपड समुद्रकिनारा, कोसबाड हिल येथील ग्राममंगल या अनुताई वाघ व ताराबाई मोडक यांच्या शैक्षणिक संस्था तसेच गोखले एज्युकेशन सोसायटीचे कृषी संशोधन केंद्र , जैन मंदिर, बल्लाळगड, गंभीरगड, सावतेकोट, सेगवागड किल्ला या ऐतिहासिक वास्तू बोर्डीच्या 2५ कि.मी. परिसरामध्ये पाहायला मिळतात. गेली १० पेक्षाही अधिक काळ दरवर्षी भरवण्यात येणारा बोर्डी येथील चिकू फेस्टिवल हे सुद्धा पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण आहे. आदिवासी सामाज्याने जपलेल्या सांस्कृतिक वारस्याची ओळख आपल्याला वारली चित्रकला व तारपा नृत्य या मार्फत करून घेता येते.
महालक्ष्मी मंदिर – डहाणू
जिल्ह्यातील प्रसिद्ध ठीकाणांमध्ये एक प्रमुख स्थान म्हणजे महालक्ष्मी .
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर निसर्गसौंदर्याने नटलेल्या विवळवेढे गावी महालक्ष्मीचे स्थान आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर ध्वजस्तंभ असून त्यावर मोठा ध्वज सदैव फडकत असतो. मंदिराच्या समोर सभामंडप, दोन दीपमाळा असून त्यांच्या मध्ये मुख्य होमकुंड आहे. त्याच्या दोन्ही बाजूंला दोन होमकुंडे आहेत. प्रतिवर्षी चैत्र पौर्णिमेला मोठा होम (यज्ञ) व वद्य अष्टमीला लहान होम असतो. या दिवसांत येथे मोठी यात्रा भरते. चैत्र पौर्णिमेला मोठय़ा होमाच्या दिवशी हजारो भाविक पायी देवळात येऊन देवीचे दर्शन घेतात. मंदिराचा प्रसिद्ध उत्सव म्हणजे चैत्रपौर्णिमेला प्रारंभ होणारी आणि पुढे पंधरा दिवस चालणारी यात्रा. या यात्रेची तयारी ज्येष्ठ प्रतिपदेपासून होते. नवसाला पावणाऱ्या श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला येणाऱ्या महाराष्ट्र, सिल्वासा, दमण, वापी आणि गुजरातच्या भाविकांचे श्रद्धास्थान बनून राहिली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी मुंबई, ठाणे, कोकण, पूणे, सातारा तसेच महाराष्ट्रातून तसेच गुजरात, दादरा नगरहवेली येथील भाविक दर्शनासाठी येतात.देवीचे मुख्यस्थान मंदिराच्या पश्चिमेस पर्वत शिखरांवर जमिनीपासून सुमारे ६०० फूट उंच असून दरवर्षी चैत्र पौर्णिमेला शिखरावर चढून ध्वज लावण्याची प्रथा रूढ आहे. हा मान पांडय़ा सातवी यांच्या घराण्यातील व्यक्ती एक महिना सात्त्विक राहून कुटुंबांपासून दूर राहून भक्ती करतो. त्यालाच हा मान दिला जातो. अणकु चीदार दिसणाऱ्या महालक्ष्मी गडाच्या शिखरावर सुमारे २५ फूट व्यासाची वर्तुळाकार सपाट भाग आहे. या शीखराच्या मध्यभागी लाकडी स्तंभावर प्रत्येक यात्रोत्सवाला ध्वज लावण्याची परंपरा आहे. मंदिरापासून शिखरापर्यंतचा सुमारे ३ ते ३.३० तासांचा हा प्रवास आहे. गडाच्या सूळक्यावर धावत जाऊन ध्वज लावणारा ध्वजनी चैत्र पौर्णिमेला रात्री १२ वाजता देवीच्या मंदिरापासून हातामध्ये तेवता दिवा, पूजेचे साहित्य, ध्वज, १२ नारळ घेऊन निघतो, तो मध्यरात्री ६०० फुट उंचीवर असलेल्या देवीच्या मुख्य स्थानी पोचतो. देवीच्या या स्थानांजवळ देवीची गुहा असून त्यात वाघाचा वास आहे, असे म्हणतात. गुहेशेजारी २० फूट लांबीचे भुयार असून अत्यंत अवघड आहे. ध्वजनीला प्रथमदर्शनी वाघाचे दर्शन दिल्यानंतर तो अदृश्य होतो. देवीचे मुळस्थान शिखरांवर असतांना भाविकांना दर्शन घेण्यासाठी श्री महालक्ष्मी मंदिराच्या पायथ्याशी येऊन स्थापित झाली, अशी आख्यायिका आहे.
अशेरीगड
पालघर जिल्हा हा आजही गडकोटांनी समृद्ध असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. बहुतेक किल्ले आज नामशेष होण्याच्या मार्गावर असताना पालघर तालुक्यातील गडकोट मात्र लहान लहान डोंगररांगांवर अजूनही आपले अस्तित्व टिकवून बर्यापैकी अवस्थेत उभे आहेत. या विभागात जे अनेक लहानमोठे किल्ले आहेत, त्यांच्यात ‘दादा’ असा वाटावा असा प्रचंड आकाराचा एक किल्ला म्हणजे अशेरीगड. इतिहास काळात ठाण्याच्या उत्तर सीमेचे रक्षण करणार्या या किल्ल्याच्या परिसरात सागाच्या झाडांचे जंगल आहे. प्रामुख्याने जहाज बांधणीस उपयुक्त ठरणार्या लाकडांमुळे या गडाचे इतिहासकाळात फार महत्त्व होते. साधारण ८०० वर्षापूर्वी शिलाहारवंशीय भोजराजाने बांधलेल्या या किल्ल्याचा ताबा महिकावती नगरी (आजचे माहीम) येथील राजा बिंबदेव याच्याकडे गेला व त्याने या गडाचा उत्तम बंदोबस्त करून येथे आपले लष्करी ठाणे बसविले.पोर्तुगीजांनी वसईत बस्तान बसविल्यावर इ. स. १५५६ साली अशेरीवर हल्ला करून तो बळकाविला व त्यांनी या गडाच्या मजबुतीकरिता अनेक नवीन बांधकामे केली. संभाजी राजांच्या कारकीर्दीत पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी इ. स. १६८३ साली तारापूरवर हल्ला करून बेचिराख केले . त्या वेळी राजांनी अशेरीगड जिंकून स्वराज्यात सामील केला पण ऑक्टोबर १६८७मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. पुढे चिमाजी आप्पा पेशवे यांच्या वसई स्वारीच्या वेळी मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून १७३७च्या कोंकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला व परत मराठ्यांचे भगवे निशाण गडावर अभिमानाने डोलू लागले. १८१८ नंतर अशेरीगड इंग्रजांच्या हाती गेला.
अशेरी गडाच्या पठारावर पडक्या वाड्यांचे अवशेष आढळतात. तसेच चर असलेले अनेक चौथरे येथे आढळतात. बहुदा घरा भोवती साचणारे पावसाचे पाणी आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी त्यांची योजना केलेली असावी. गडावरची गुहा मध्यम आकाराची व रूंद तोंडाची आहे. परंतु ती खडकात अशा खुबीने खोदलेली आहे की भणाणणार्या वार्याला व थंडीला अजिबात प्रवेश मिळू नये. गुहेचा पृष्ठभाग अतिशय खडबडीत आहे. मात्र इथे आत व बाहेर पहारेकर्यांना झोपण्यासाठी दगडी पलंग (बर्थ) केलेले आहेत. येथे गुहेच्या तोंडाशी दोन जास्वंदीची झाडे आहेत.गुहेच्या वरच्या अंगाला एक चौकोनी बांधीव तळे आहे. या तळ्यात एक अर्धवट बुडालेली तोफ दिसते. याशिवाय आणखी दोन अर्धवट बांधलेली तळी आहेत. वरच्या पठारावरून आग्नेय दिशेकडे पाहिल्यास कोहोजगड स्पष्ट दिसतो. दुर्बिणीने त्यावरील निसर्गनिर्मित मानवी पुतळाही सहज निरखता येतो. याच दिशेने पुढे गेल्यास कड्याला गेलेली मोठी चीर व पुढे एक बांधीव बुरूज दिसतो. गडावर जाण्याच्या वाटा : गडावर जण्यसठी एकच वाट आहे. पालघरहून कासा या शहराकडे जाणाऱ्या एस.टी. बसने किंवा या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनाने निघून ‘मस्तान नाका’ या ठिकाणापासून सुमारे १०-११ कि.मी. वर असणाऱ्या ‘खोडकोना’ गावाच्या स्टॉपला उतरायचे..खोडकोना म्हणजे अशेरी गडाच्या पायथ्याशी असलेल पाच-पंचवीस घर असलेल छोटस पण लोभस गाव. प्रत्यक्ष गाव महामार्गापासून थोडे आत आहे. गावात जाण्यासाठी रस्त्याच्या डावीकडे बैलगाडीची वाट आहे. महामागावरूनच पालघरकडे पाठ करून उभे राहिल्यास उजवीकडे अडसूळ व डावीकडे प्रचंड असा अशेरीगड दिसतो. बैलगाडीची वाट ऐका सिमेंटच्या पुलावरून गावात शिरते. इथे वेशीवरच वाघदेवाचे छोटेसे परंतु टुमदार मंदिर आहे. आत गेल्यावर विस्तीर्ण पसरलेले आम्रवृक्ष, शेते व त्यातून डोकावणारी घरे प्रवासाचा शीण घालवताता. विहिरीच्या थंड पाण्याने आपल्या बाटल्या भरून गावकऱ्यांनी दाखवलेल्या वाटेने खिंडीकडे निघायंच. वाट जंगलातून जात असल्याने उन्हाळ्यातही त्रास होत नाही. साधारणतः खिंडीत पोहोचण्यास एक ते दीड तास लागतात. वाट इथपर्यंत सोपी पण चढणीची आहे. खिंडीत थोड्या वरच्या बाजूला वाघदेवाचे छोटे उघडे देऊळ आहे. खिंडीतून उजवीकडे वळून गडमाथ्याकडे निघायचं. इथे एका मोठ्या खडकाला वळसा घातल की आपण दरवाजाच्या खाली येतो. इथे दगडावर कोरलेली एक छोटी गणेशमूर्ती आहे. दरवाजा सुरुंगाने फोडलेला आहे. इथे मात्र वर चढतांना काळजी घेणे आवश्यक आहे.
वाघोबा खिंड
आदिवासी समाज हा परंपरा जपणारा समाज म्हणून आजही सर्वश्रृत आहे . पालघरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाघोबा घाटात आपल्या संस्कृतीचा वारसा जपत , पारंपरिक वाद्याच्या तालावर ठेका धरत मोठे- लहान भेदभाव न करता खांद्याला खांदा लावून नाचणारी बेधुंद झालेल्या आदिवासींना पाहिल्यावर त्यांच्या समाजाची एकता व बंधुता याचे दर्शन घडते. . निसर्ग पूजणारा हा समाज या दिवशी एकत्र येत परिसरातील प्राचीन काळापासून असलेल्या वाघोबा,भिलोबा व मेघोबा देवाची मनोभावे पूजा-अर्चा करून हा निसर्ग अबाधित ठेवण्यासाठी साकडे घालण्याची परंपरा आजही जपत आहेत.वाघोबा खिंड परिसरातील वाघोबा देवस्थानाचा वाघोबा उत्सव म्हणजे लहानग्यांपासून थोरल्यापर्यंत आदिवासी- बिगरआदिवासी बांधवांचा आनंदोत्सव असतो. या दिवशी स्वतःच्या समाजाप्रती असलेली निष्ठा व एकत्र कुटुंबपद्धतीची चालत आलेली त्यांची परंपरा याचे जिवंत उदाहरण येथे पाहावयास मिळते. परिसरात तारप्याचा घुमलेला नाद व त्या तालावर बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई असे या उत्सवाचे खास आकर्षण असते. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अत्यंत निसर्ग रमणीय या ठिकाणी भटक्यांची पावले आपोआपच वळतात .केळवे किनारपट्टीचा मुगुट
कोकणामधिल पर्यटन म्हटले की सर्वसाधारणपणे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ही प्रसिद्ध ठिकाणे आणि तेथिल समुद्र किनारे डोळ्यासमोर येतात . पण काही किनारे जे थोडेसे बाजूचे असतात जे फार वेगळे असतात आणि त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नसते . असाच एक किनारा म्हणजे आधी ठाणे आणि आता पालघर जिल्ह्यात असलेला पालघरपासून अंदाजे 13 किमी वर असलेला प्रचंड सुंदर आणि मोठा केळवे बीच. छोट्याश्या रोड वरून जाताना आपल्याला सुपारी, नारळ पोफळीच्या उंच झाडांमध्ये बसलेल्या वाड्या मागे टाकत सुंदर वनश्रीने नटलेला रस्ता तुम्हाला केळवे बीच कडे नेतो. डहाणू ते वेंगुर्ला या पट्ट्यामध्ये बोर्डी शांत आणि अथांग समुद्रानंतर जो मोठा समुद्र किनारा दिसतो तो केळवेचा . भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शितळा देवीचे मंदिर हे इथले एक प्रमुख आकर्षण असुन भाविकांच्या गर्दीने ते कायमच गजबजलेले असते . जवळपास ८ कि.मी लांबीच्या केळवा समुद्र किनार्या लगत एक दक्षिणेकडे आणि एक उत्तरेकडे दोन किल्ले ही आपण बघू शकतो .केळवे पाणकोट किंवा केळवे जंजिरा या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला केळवे गावाच्या दक्षिणेला भर समुद्रात आहे. दांडा खाडी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते, त्याच मार्गावरील खडकावर या किल्ल्याची उभारणी भर समुद्रात केल्यामुळे दांडा खाडीवर व समुद्रावर एकाचवेळी नियंत्रण ठेवणे पोर्तुगिजांना सहज साध्य झाले.जहाजाच्या आकाराचा हा सुंदर पण अपरिचित पाणकोट आजही सुस्थितीत उभा आहे. ओहोटीच्या वेळी अलिबागच्या कुलाबा किल्ल्याप्रमाणे समुद्राचे पाणी किल्ल्याच्या पाठीमागे जाते त्यामुळे जमिन उघडी पडते व खुष्कीच्या मार्गाने किल्ल्यावर जाता येते.
टोके समुद्रकिनारा
मुंबईपासून 110 किलोमीटर अंतरावर केळवा समुद्र किनार्याला जवळ असुनही असलेला प्राचीन आणि निर्जन हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेला ; अरबी समुद्राची चित्तथरारक दृश्ये देणारा महाराष्ट्रातील कमी प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक असणारा टोके समुद्रकिनारा हा ज्यांना शहरी जीवनातील गजबजून बाहेर पडायचे आहे त्यांच्यासाठी अतिशय योग्य ठिकाण आहे.खडकांनी वेढलेला आणि मुख्य रस्त्यावरून सहज दिसुन न येणार्या टोके बीच ला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम काळ मानला जातो . या महिन्यांतील हवामान आल्हाददायक आणि समुद्रकिनाऱ्यावरील क्रियाकलापांसाठी आदर्श आहे. समुद्रकिनार्यावर जाण्यासाठी एका छोट्या जंगलातून ट्रेक करून खडकाळ खडकांवरून खाली जावे लागते. समुद्रकिनाऱ्यावरचा हा ट्रेक एक रोमांचकारी अनुभव असुन समुद्रकिनाऱ्यावर पोहोचल्यानंतरचा पर्यटक त्याच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध होतो . मऊ पांढरी वाळू आणि क्रिस्टल स्वच्छ पाण्यासह समुद्रकिनारा स्वच्छ आणि प्राचीन असुन . समुद्रकिनाऱ्याची शांतता हे विश्रांती आणि कायाकल्पासाठी एक योग्य ठिकाण बनले आहे . हा समुद्रकिनारा सर्फिंग, पॅरासेलिंग आणि जेट-स्कीइंग सारख्या अनेक साहसी क्रीडा प्रकारासाठी एक अत्यंत उत्तम ठिकाण आहे . किनार्यावरिल पांढर्या शुभ्र वाळूमधुन विगवेगळ्या प्रकारचे शंखशिंपले गोळा करत मारलेला फेरफटका किंवा येथे मिळणार्या थंड उत्साहवर्धक नीरेचा आस्वाद घेत ताडाच्या झाडाखाली शांतपणे बसुन येथिल सुर्योदय आणि सुर्यास्ताचे विहंगम छायाचित्रण करण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. किनार्यावर आदळणार्या लाटांचा आवाज, समुद्राचे थंड वारे आणि शांत वातावरणामध्ये तंबू लाऊन येथे घालविलेली रात्र हा एक अविस्मरणीय अनुभव असतो . त्याचमुळे टोके बीच हे कॅम्पिंगसाठी एक अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. या समुद्रकिनार्यावर जाण्यासाठी केळवा समुद्र किनार्यालगतच्या गावामधुन जाणकार मार्गदर्शकाच्या मदतीने एका छोट्याश्या जंगलामधुन केलेला मध्यम स्वरूपाचा ट्रेक ही एक आगळी वेगळी अनुभुती असते .
सुर्यमाळ
पालघर जिल्ह्याच्या पुर्वेस वाडा मार्गे मोखाडा तालुक्यातील सुर्यमाळ हे तानसा अभयारण्यातील थंड हवेचे ठिकाण. उन्हाळ्यात येथील थंड हवा तर पावसाळ्यातील सौंदर्य म्हणजे डोळ्यांचे पारणे फिटवून टाकणारा ऐक सुखद अनूभव असतो. लोणावळा-खंडाळ्या प्रमाणेच निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि मुंबईच्या अतिशय जवळ असून सुद्धा या पर्यटन स्थळाविषयी फारशी माहिती पर्यटकांना नाही. वाड्याहून 45 कि. मी. च्या प्रवासादरम्यान रस्त्यांच्या दुतर्फा गर्द हिरवळ, मोठ्या पर्वत रांगा, नागमोडी घाट, वाहणारे धबधबे-नदी, वेगवेगळे पक्ष्यांचे-प्राण्यांचे आवाज, मोठ्या प्रमाणात वेगवेगळी झाडे, दुर्मीळ वनस्पती, जैवविविधतेने नटलेले तानसा अभयारण्य मनमोहन टाकते. सूर्यमाळावरून सनसेट पॉईंट वरील सूर्यास्ताच्या वेळेसचा नजारा खूपच सुंदर असतो.
तानसा अभयारण्यामध्ये समावेश असल्याने निसर्गाच्या सानिध्यामधिल या ठिकाणी वनविभागाकडून अत्यल्प भावात पर्यटकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यासाठी पर्यटकांना बुकिंग हे विभागीय कार्यालय ठाणे वन्यजीव, वनपरिक्षेत्र कार्यालय परळी-वाडा, परीमंडळ कार्यालय, सुर्यमाळ येथे करता येते.गंभीरगड
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात गुजरात सीमेवर वसलेला एक शांत आणि गंभीर किल्ला . नावाप्रमाणेच गंभीर भासणारा गंभीर गड . तसा महाराष्ट्राच्या एका कोपर्यात असलेला हा गड प्रथम भेटीतच अतिश्य आनंद देउन जातो. गंभीरगड, कोहोज आणि अशेरी अशी दुर्ग त्रिकुटाची यात्रा करता येऊ शकते. सुंदर व दुर्गम चढाई सुंदर नैसर्गिक दृश्य चहू बाजूनी जंगलात वेढलेला गांभिरगड किल्ला दिसायला जेवढा सुंदर तेवढा दुर्ग सर करायलाही थरारक आहे . छत्रपती शिवाजी महाराजांनी दुरुस्त केलेल्या किल्ल्यांच्या यादीत गंभीरगडचा संदर्भ आढळतो. इ.स.१६७२-७७ दरम्यान मोरोपंत पिंगळे यांनी सेगवा गडाबरोबर गंभीरगडही स्वराज्यात आणला. छत्रपती संभाजीराजे यांनी इ.स.१६८३ रोजी उत्तर कोकणावर स्वारी केली असता त्यांनी तारापूर, अशेरीगडासह गंभीरगडही जिंकून घेतल्याची नोंद आहे. इ.स. १७३७-३९ मधील वसई मोहिमेत चिमाजीअप्पांनी ठाण्यातील इतर किल्ल्यांबरोबर गंभीरगडही जिंकून घेतला. १६ मे १७३९ रोजी शेवटचा हल्ला वसई किल्ल्यावर करून पोर्तुगीजांचे उत्तर कोकणातुन कायमचे उच्चाटन केले. नंतरच्या काळात हा किल्ला जव्हारकरांच्या ताब्यात गेला असावा कारण २४ फेब्रुवारी १७५० रोजी गंभीरगड किल्ला व त्याखालील महाल रामदेव राणा रामगीरकर कोळी यांजकडून राघोबा नारायण यांनी जिंकुन घेतल्याची नोंद पेशवे दफ्तरात आढळते.पालघर जिल्ह्याच्या निसर्गसंपदेमध्ये भर घालणारी असंख्य ठिकाणे जिल्ह्यामध्ये आहेत . निसर्गसौंदर्याने परीपूर्ण असे पालघर जिल्ह्यामध्ये असणारे जवळपास ३६ किल्ले – समुद्रकिनारे – धरणे – अभयारण्य – हिल स्टेशन अशी विविधता लाभलेल्या पालघर जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी आवश्यक सोई सुविधा काही अपवाद वगळता अजुनही म्हणाव्या तितक्या प्राप्त झालेल्या नाहीत . मुंबई पासुन अगदी जवळ असुनही त्या मानाने दुर्लक्षित या ठिकाणांची भेट ही निश्चितच एक अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो.
नितान्त खंडेराव राऊत
वाईल्ड हॅबिटाट जर्निज – वसई
९८६०५०८३०८
![]()

आजच्या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता सर्वांनाच आवश्यक झाले आहेत. मुक्त आणि शहरी गोंगाटापासून लांब स्वच्छंदपणे दोन दिवस निसर्गाच्या विविध रुपांचा आस्वाद घेत भटकण्याची अनामिक ओढ आणि धकाधकीच्या रोजच्या आयुष्यामधे निवांत वेळ काढुन दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. साधारण दिवाळी संपली की सर्वाना भटकंतीचे वेध लागतात. पर्यटनाच्या दृष्टीने हा ऋतू सर्वोत्तम असतो. गुलाबी थंडी, आल्हाददायक वातावरण, धुक्याची दुलई यामुळे या दिवसांत फिरण्याची मजा काही औरच! उन्हाचा त्रासही जाणवत नाही आणि दमछाकही होत नाही. अशा वेळी जवळच्या पण गर्दी नसलेल्या ठिकाणांचा शोध सुरू असतो. ठिकाणाची निवड अचूक असेल तर भटकंतीचा आनंद द्विगुणित होतो. सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल , किर्र घनदाट जंगल , प्रखर उन्हालाही जंगलात दबकत… दबकत उतरावे लागावे अशी झाडी , घनदाट झाडीमधुन येणारे पक्षी आणि प्राण्यांचे चित्र विचित्र आवाज . मुक्त आणि शहरी गोंगाटापासून लांब स्वच्छंदपणे दोन दिवस निसर्गाच्या विविध रुपांचा आस्वाद घेत भटकण्याची अनामिक ओढ सर्वसामान्य पर्यटकाला शहरापासून बाहेर परंतु शक्यतो जवळ असणार्या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी प्रेरित करते. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेकविध आश्चर्यांनी नटलेली अनेक ठिकाणे आपल्याला नेहमीच खुणावत असतात.