पुणे शहराचे शिलेदार वसई विरार शहरात…..उत्तम प्रशासकीय सेवेचा फायदा वसई विरार शहराला….!

नवे आयुक्त २०१४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी पृथ्वीराज बी.पी. हे एक अत्यंत कार्यक्षम आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात.
वसई-विरार शहरासारख्या अत्यंत वेगाने विकसित होणाऱ्या आणि भौगोलिकदृष्ट्या विस्तारलेल्या शहरात नागरी सुविधांचे प्रश्न कायम चर्चेत असतात.मात्र तरीही प्रश्न समस्या सोडवण्यात माहिर असलेले आणि गुड गव्हर्नस म्हणून पारितोषिक घेतलेले मुख्यमंत्री देवाभाऊ चे विश्वासू शिलेदार म्हणून वसईत थेट आयएएस दर्जाचा अधिकारी द्या ही मागणी भाजपाची एकार्थी पूर्ण झाली…
अर्थात शहरातील वाढते नागरीकरण आणि त्याला अपुरी पडणारी व्यवस्था आणि ती राबवणे, नगररचना विभागातील वाढता ताण, पाणीपुरवठा, अनधिकृत बांधकामे, मोकळे रस्ते, फुटपाथ, फेरीवाले आणि विशेष म्हणजे शहरातील कचरा व्यवस्थापन, टेंडर प्रक्रिया, सरकारी अनुदान आणि नवा वसई विकास आराखडा आणि राजकीय परिस्थितीला जुळवून घेण्याचं तंत्र…यांसारख्या गंभीर प्रश्नांवर नवीन आयुक्तांची भूमिका नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे.
वसई: -आशिष राणे
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्त पदी आय.ए.एस दर्जाचे अधिकारी म्हणून पृथ्वीराज बी. पी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मंगळवारी सकाळी राज्यशासनाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी हे दि. ३१ मार्च २०२६ रोजी सेवेतून निवृत्त होत आहेत.
त्यांच्या जागी शासनाने त्वरित आता वसई विरारचे नवे आयुक्त म्हणून पृथ्वीराज बी.पी यांची नियुक्ती केली आहे.

पृथ्वीराज बी. पी. हे २०१४ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस (IAS) अधिकारी आहेत. ते सध्या पुणे महानगरपालिकेत अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. प्रशासकीय सेवेत ते पुणे शहरातील विविध विकासकामे, कर संकलन आणि अतिक्रमण विरोधी कारवाईसाठी ओळखले जातात.
आता त्यांची वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती केली आहे. राज्य शासनाचे सह सचिव सुभाष उमराणीकर यांनी याबाबतचे लेखी आदेश जारी केले आहेत.
शहराच्या विकासकामांना गती देणे आणि महानगर पालिकेच्या एकूणच कारभारात शिस्त आणण्याचे मोठे आव्हान आता त्यांच्यासमोर असणार आहे.

चला…नव्या आयुक्ताविषयी… जाणून घेऊ या…
पृथ्वीराज बी. पी. (Prithviraj B.P.) हे २०१४ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्रात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले असून प्रशासकीय वर्तुळात ते एक शिस्तप्रिय आणि अभ्यासू अधिकारी म्हणून ओळखले जातात.
त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील काही प्रमुख पदे आणि कामांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
जिल्हाधिकारी, लातूर:
पृथ्वीराज बी. पी. यांनी डिसेंबर २०२० ते जुलै २०२३ या काळात लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार सांभाळला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्यातील जलसंधारण, शिक्षण आणि आरोग्य सुविधांवर विशेष भर दिला होता. विशेषतः कोरोना काळानंतर जिल्ह्याची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), नागपूर स्मार्ट सिटी:
जुलै २०२३ मध्ये महाराष्ट्र शासनाने केलेल्या मोठ्या प्रशासकीय बदल्यांमध्ये त्यांची नियुक्ती नागपूर स्मार्ट सिटीच्या (Nagpur Smart City – NSSCDCL) मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली. नागपूर शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरी सेवा अधिक सक्षम करण्याचे काम त्यांनी या पदावर असताना पाहिले.
इतर अनुभव:
याआधी त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO, ZP Kolhapur) म्हणूनही काम केले आहे. जिल्हा परिषदेत कार्यरत असताना त्यांनी ग्रामीण विकास, स्वच्छता मोहिमा आणि ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी विविध उपक्रम राबवले होते.
पृथ्वीराज बी. पी. यांना जिल्हा प्रशासन, ग्रामीण विकास आणि शहरी पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांतील कामाचा दांडगा अनुभव आहे. सध्या ते राज्य प्रशासनातील एका जबाबदार पदावर कार्यरत असून, त्यांच्याकडे क्लिष्ट प्रकल्प मार्गी लावण्याचे कसब असल्याचे मानले जाते.
✅⚠️महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास मेसेज मार्फत खालील web news portal वर संपर्क साधा !
Mymarathi7.com
राज्य शासन आदेश प्रत ✅

![]()
