विरारमध्ये श्री द्वारकाधीश मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सव दि.26 नोव्हेंबरपासून : 5 दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल…
प्रत्येक गोष्टीची वेळ आणि काळ आधीच ठरलेली असतें फक्त आपली जिद्द, भक्ती आणि अथक प्रयत्न करत राहणं गरजेचं असतं…. देव असाच प्रसन्न होत नाही : त्यासाठी निस्सीम भक्ती त्याग वृत्ती -सेवाधर्म जोपासावं लागतो…
आणि श्रीकृष्ण भक्त प्रविणाताईनी हे द्वारकाधीश मंदिर विरार येथे निर्माण होण्यासाठी एका तपाची विलक्षण प्रतीक्षा केली आहे आज हे भक्तिमय स्वप्न साक्षात साकार होताना वसईकरांना लोचनी दिसत आहे..होय आता द्वारका विरार शिरगांव मध्ये अवतरली असून याठिकाणी प्रति द्वारकाधीश मंदिर भक्तदर्शनासाठी आजपासून खुलं होत आहे.
या मंदिर उभारणीची विशेष माहिती श्री कृष्ण भक्त प्रविणा ताई यांच्या वतीने देण्यात आली आहे… आपण ऐकू या.. (व्हिडीओ संग्रहीत)
वसई :- आशिष राणे…
विरारच्या पूर्वेकडील शिरगाव परिसरातील विवा आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या नजीक वसई विरार शहर महानगपालिकेच्या माजी महापौर तथा श्रीकृष्ण भक्त प्रविणाताई हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य असे श्री द्वारकाधीश मंदिर उभारण्यात आले आहे.
आज बुधवार दि.26 नोव्हेंबर पासून या भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात होत आहे. मूर्ती स्थापना, द्वारोद्घाटन आणि विविध धार्मिक विधींसाठीची सर्व तयारी मंदिर परिसरात पूर्ण करण्यात आली आहे. तर विशेष म्हणजे जगद्गुरु शंकराचार्य स्वामीश्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती ‘१००८’ यांच्या आगमनाची भक्त उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
या महोत्सवाचा शुभारंभ दि. 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:34 वाजता मूर्ती स्थापना (प्राणप्रतिष्ठा) विधीने होणार असून त्यानंतर पूर्णाहुती आणि सायंकाळी 4 वाजता जगद्गुरु शंकराचार्यजींच्या करकमलांनी मंदिराचे द्वारोद्घाटन होणार आहे.
पुढे दि.27 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता त्यांच्या वचनामृताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याच दिवशी सायंकाळी केरळमधील पारंपरिक थिरुवातिरा नृत्य तसेच राधाकृष्ण नृत्य प्रस्तुती (विकी मूनजी आणि ग्रुप) सादर केली जाणार आहे.
दि.28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजल्या पासून श्री मुकुंद व बालाजी मंदिर भजन समूहाचा कार्यक्रम होईल, तर रात्री 9 वाजता श्री अनुप जलेटा यांच्या भजन संध्येला भक्त उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान दि.29 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता भव्य दर्शन आणि सायंकाळी 8 वाजता अनमोल मित्र मंडळाचा पारंपरिक ढोल-ताशा कार्यक्रम होणार आहे.
आणि दि.30 नोव्हेंबर ला दुपारी 12 वाजता भंडारा व प्रसाद वितरण करण्यात येईल. सायंकाळी 7 वाजता देवराज गढवी यांची पारंपरिक गुजराती डायऱ्याने महोत्सवाचा समारोप होणार आहे.
या धार्मिक उत्सवासाठी माजी महापौर तथा श्रीकृष्ण भक्त प्रविणाताई ठाकुर, माजी आमदार हितेंद्र विष्णु ठाकूर आणि संपूर्ण ठाकूर परिवार यांनी सर्व भक्तांना जास्तीत जास्त संख्येने या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
![]()
