शेकडो साहित्य प्रेमी रसिकांच्या उपस्थितीत साहित्य जल्लोष आणि समाज उन्नती मंडळाचा ‘जागर मराठी`सोहळा उत्साहात संपन्न…!

वसई :- मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वसईतील माणिकपूर येथील समाज उन्नती सभागृहात साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आणि समाज उन्नती मंडळ संचलित मनोहर वाचनालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागर मराठी` या विशेष कार्यक्रमाचे उत्स्फूर्त आयोजन करण्यात आले होते. कवियित्री स्नेहा संदीप पंडित यांच्या ‘निसर्ग किमया` या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका दीपाली केळकर यांच्या हस्ते या काव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना स्नेहा पंडित यांनी निसर्ग आणि कवितेचे नाते उलगडले. “कवितेचे खरे सौंदर्य हे शब्दालंकारांनी खुलते आणि निसर्ग हा एक शाश्वत चमत्कार आहे. निसर्गात रमणाऱ्या सखीमध्ये असणारा भाबडा जीव हाच काव्याचा आत्मा असून, त्यामुळेच माझ्या कवितेचा चेहरा निसर्गाचा होऊन बोलतो,अर्थात पुस्तकं हाच आयुष्य जगण्याचा खरा दागिना आहे,अशा भावना त्यांनी कार्यक्रमात व्यक्त केल्या. निसर्गाला देखील स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो, हा विचार त्यांनी आपल्या काव्यसंग्रहातून समाजा समोर मांडला आहे.

या प्रसंगी आयोजित ‘आम्ही मराठी` या परिसंवादाने उपस्थितांची मने जिंकली. दीपाली केळकर यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत हा संवाद साधला. यामध्ये इस्रायलहून आलेल्या यार्देना शालोम सानकर यांनी आपल्या वडिलांनी लावलेल्या वाचनाच्या आवडीमुळे हिब्रू मातृभाषा असूनही त्या आजही मराठीशी कशा जोडलेल्या आहेत, हे सांगितले. तर घरी गुजराती वातावरण असूनही संपूर्ण शिक्षण आणि साहित्य लेखन मराठीतूनच करणारे वर्जेश सोलंकी यांनी भाषेची प्रादेशिक सीमा ओलांडली. मुस्कान चुरीहार यांनी मराठी खाद्यसंस्कृती आणि साहित्याबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले, तर फादर ज्यो आल्मेडा यांनी मराठी माध्यमातील शिक्षण आणि साहित्याच्या आवडीबद्दल भाष्य केले. या परिसंवादातून मराठी भाषेची व्याप्ती आणि तिची सर्वसमावेशकता अधोरेखित झाली.

कवियित्री स्नेहा पंडित यांनी आपल्या मनोगतात पर्यावरणाच्या ज्वलंत विषयाला स्पर्श केला. “निसर्गाची बारीकसारीक हालचाल, हिरवळीचा साज आणि वादळातही तग धरून राहण्याची जिद्द या काव्यसंग्रहातून मांडली आहे. निसर्ग आपल्याला भरभरून देतो, पण प्राणी आणि झाडांनाही मोठा संघर्ष करावा लागतो. पृथ्वीचा श्वास असलेल्या हिरव्या छटांचा जिवंत अनुभव वाचकांना यातून मिळेल,“ असे ही कवयित्री स्नेहा पंडित म्हणाल्या.
या सोहळ्याला सर्वश्री साहित्यिक अँड्य्रू कोलासो, स्थायी समितीचे माजी सभापती संदेशभाऊ जाधव, डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे, माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज, नगरसेवक कल्पेश मानकर, अजय रॉड्रिग्ज, नगरसेविका पुष्पा जाधव, प्रमिला पाटील, सुवर्णा पाटील, मार्शलीन चाको, वर्जेश सोलंकी, मुस्कान चुहीकर आणि वसई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप पंडित यांच्यासह मोठ्या संख्येने साहित्यिक, पत्रकार मंडळी,लेखक, कवी आणि रसिक वाचक उपस्थित होते. यां कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदेशभाऊ जाधव यांनी केले, तर उपस्थितांनी कवियित्री स्नेहा पंडित यांच्या निसर्गप्रेमी लेखनाचे भरभरून कौतुक केले.
***
![]()
