पालघर जिल्ह्यातील २४२ वरिष्ठ श्रेणी व ४०४ निवड वेतनश्रेणी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले सोबत वसई तालुक्यातील १२७ वरिष्ठ वेतनश्रेणी आणि ५८ निवड वेतनश्रेणी शिक्षकांचे प्रशिक्षण विरारच्या विवा महाविद्यालयातील सुसज्ज वातावरणात आयोजित करण्यात आले
विरार :-
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या राज्यस्तरीय शिखर संस्थेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक सेवेत १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व २४ वर्ष पूर्ण झालेले शिक्षकांसाठी निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण दि.०२ जून ते १२ जून २०२५ दरम्यान प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षणासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पालघर यांनी तालुकास्तरीय प्रशिक्षणाचे नियोजन करून पालघर जिल्ह्यातील २४२ वरिष्ठ श्रेणी व ४०४ निवड वेतनश्रेणी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.
संपूर्ण वसई तालुक्यातील १२७ वरिष्ठ वेतनश्रेणी आणि ५८ निवड वेतनश्रेणी शिक्षकांचे प्रशिक्षण विरारच्या विवा महाविद्यालयातील सुसज्ज वातावरणात आयोजित करण्यात आले होते.
या संपूर्ण दहा दिवस चाललेल्या या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणातील शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये शिफारशी केलेल्या अनेक घटकांचे प्रशिक्षण देण्यात आले.
संपूर्ण जिल्ह्याच्या प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून तानाजी डावरे यांनी कामकाज पाहिले.या प्रशिक्षणासाठी वसईमध्ये तालुकास्तरीय समन्वयक म्हणून सुजाता म्हात्रे व उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य मुग्धा लेले यांनी कामकाज सांभाळले.
या प्रशिक्षणासाठी राज्यस्तरावरून प्रशिक्षण घेऊन आलेले डॉ.महेंद्र घरत, डॉ महादेव इरकर,प्रा.स्वाती जयकर यांनी जिल्ह्यातील ६४ सुलभकांना प्रशिक्षण देऊन त्यांना तालुक्यावर प्रशिक्षण देण्यासाठी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाच्या सांगता समारंभामध्ये जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संभाजीराव भोजने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,विविध प्रकारची प्रशिक्षण ही केवळ शिक्षकांची गुणवत्ता वाढवत नाहीत तर त्यांना येणाऱ्या नव्या शैक्षणिक धोरणाला आणि बदलाला सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवितात म्हणून प्रशिक्षण ही काळाची गरज असल्याचे मत प्राचार्य भोजने यांनी आपल्या सांगता समारंभात व्यक्त केले.

यावेळी त्यांच्या समवेत उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयिका कल्पना राऊत यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.
दरम्यान वसई तालुक्यामध्ये १८ सुलभकांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन करून विरार च्या विवा महाविद्यालयात दहा दिवस आयोजित केलेलं हे शिक्षक प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडल्याची सविस्तर माहिती प्रा.डॉ महादेव इरकर यांनी दिली.
![]()
