वसईच्या आम. स्नेहाताई दुबे-पंडित सहकारी आमदारांसोबत  लंडनच्या अभ्यास दौऱ्यावर !

नवीन अनुभव, नवा दृष्टीकोन.. वसई आणि राज्याच्या विकासासाठी आम्ही निघालोय लंडनला…..

महाराष्ट्रातील १५ आमदार अभ्यास दौऱ्यासाठी लंडनला रवाना झाले असून शहरी नियोजन, पायाभूत सुविधा आणि प्रशासन प्रणालीचा  अभ्यास करून राज्यातील विकासकामांसाठी हा अनुभव वापरण्याचा उद्देश या दौऱ्यामागे आहे.

मुंबई /वसई :- आशिष राणे

महाराष्ट्र राज्यातील विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदार रविवारी (१५ फेब्रुवारी ) ला लंडन देशाच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.

विशेष म्हणजे या अभ्यास दौऱ्यावर भाजपाच्या वसई विधानसभेची संघर्षकन्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांचा हीं खास समावेश असल्याची माहिती त्यांच्या वसईतील जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे. या बातमीने सोशल मीडियावर आमदार स्नेहा ताईंच्या लंडन दौऱ्याची खुमासदार चर्चा रविवार पासून संबंध पालघर जिल्ह्यात रंगू लागली आहे.

राज्यातील निवडक अशा सर्व १५ आमदारांचा हा अभ्यास दौरा १५ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी  दरम्यान लंडन येथे संपन्न होत आहे.

विशेष म्हणजे या दौऱ्यामध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष मिळून महायुतीच्या सत्ताधारी आमदारां सोबत विरोधी पक्षाचे काँग्रेस, उबाठा आणि राज्यपाल नियुक्त (mlc ) तसेच शिक्षक मतदार संघ असे काही आमदार देखील हसत मुखत हातात हात घालून या दौऱ्यासाठी अभ्यास गटात नियुक्त आहेत.

राज्यातील विधानसभा आणि विधान परिषद सभागृहातील साधारण  १५ आमदार या अभ्यास दौऱ्यासाठी लंडनला रवाना झाले असून येत्या २२ फेब्रुवारी रोजी हे सर्व आमदार भारतात मायदेशी परतणार आहेत.

या अभ्यास दौऱ्यात… कोण कोण आमदार आहेत..?

मिळालेल्या माहितीनुसार,सर्वश्री आमदार बाबासाहेब देशमुख, परिणय फुके, विक्रम पाचपुते, नमिता मुंदडा, निरंजन डावखरे, स्नेहा दुबे पंडित, विक्रांत पाटील, अमित गोरखे, विक्रम काळे, विश्वजीत कदम, वरुण सरदेसाई, मनीषा कायंदे, सुमित वानखेडे आणि योगेश टिळेकर, अदिती तटकरे अशी या दौऱ्यातील आमदारांची नावे आहेत.

या दौऱ्यात लंडनमधील प्रशासकीय कामकाज, शहरी व्यवस्थापन आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सोयी -सुविधा यांचा अभ्यास केला जाणार आहे. तसेच अत्याधुनिक शहरी नियोजन, भक्कम पायाभूत सुविधा, सक्षम सार्वजनिक सेवा, व्यवस्था आणि नागरिक केंद्रित प्रशासनाचा आमदारांकडून अभ्यास केला जाणार आहे.

सोबत प्रशासकीय निर्णयप्रक्रिया आणि नागरिककेंद्रित सेवांची कार्यपद्धती यांचा देखील अभ्यास हे सर्व आमदार करतील आणि त्याचा प्रत्यक्षात उपयोग राज्यातील धोरणनिर्मिती आणि शहरी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी केला जाणार असल्याचं या दौऱ्याच उद्दिष्ट आहे.

दौऱ्यात पर्यटन अधिक, अभ्यास थोडासा…?

खरं तर केंद्र व राज्य शासन स्तरावर यापूर्वी हीं असे अनेक परदेश दौरे झाले आहेत आणि होत आहेत  मात्र नेहमीच आमदार व मंत्र्यांनी केलेले हे अभ्यास दौरे कमी आणि पिकनिक वजा पर्यटन दौरे जास्त मोलाचे ठरले असल्याची वंदिता नेहमीच ऐकू आली आहे.सोबत टीका ही केली जाते.

असो परंतु त्यामुळे या दौऱ्यामध्ये नेमके अभ्यासू आमदार किती आणि ते या दौऱ्यात अभ्यास किती व कसा करणार आणि त्याचा राज्य व स्थानिक मतदार संघ आणि त्यातील महानगरपालिका यांना नेमका किती फायदा होणार हे पहाणे भविष्यात महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान याबाबतची माहिती देताना वसईच्या अभ्यासू आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी सांगितलं, कीं,महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शहरी व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्याच्या उद्देशाने आम्ही सर्वजण लंडन मध्ये अभ्यास दौऱ्यासाठी जात आहोत तसेच नवीन अनुभव, दृष्टीकोन.. वसई आणि राज्याच्या विकासासाठी आम्ही विधानसभा व विधानपरिषद मधील सहकारी आमदारांसह दौऱ्यावर जात आहोतं आणि नक्कीच या अभ्यास दौऱ्याचा राज्याला व माझ्या वसई विधानसभा मतदार संघास कसा उपयोग होइल याकडे माझा कल असेल… असे स्पष्ट केलं.

कसा असेल लंडन मधील अभ्यास दौरा…!

या दौऱ्यात लंडन येथील अत्याधुनिक शहरी नियोजन, भक्कम पायाभूत सुविधा, सक्षम सार्वजनिक सेवा व्यवस्था आणि नागरिक केंद्रित प्रशासनाचा प्रत्यक्ष अभ्यास केला जाणार आहे. तसेच University of Wales Trinity Saint David (UWTSD) येथे सुशासन व सार्वजनिक धोरण यांवरील अभ्यासक्रमाद्वारे आधुनिक प्रशासकीय निर्णयप्रक्रिया समजून घेणार आहेत.

दुसरीकडे हा अभ्यास दौरा एक अनौपचारिक प्रशिक्षण कार्यक्रम असून एका आठवड्याच्या या कार्यक्रमात ‘जागतिक नागरिकत्व’ (Global Citizenship) ही तत्त्वे आपल्या शासन, धोरण विकास आणि प्रशासकीय दृष्टिकोनात कशी बदल घडवून आणू शकतात, याचे सखोल मार्गदर्शन आमदारांना केले जाणार आहे.

​त्याचप्रमाणे वेस्टमिन्स्टर (Westminster), वेल्सची संसद (Senedd), यांचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी सर्व आमदारांना मिळणार आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमा दरम्यान नेटवर्किंग आणि सहकार्याने काम करण्यावर भर दिला जाणार असून लंडन येथील नामवंत उद्योगपती, नागरी नेते, राजकारणी आणि धार्मिक नेत्यांसोबत १८ फेब्रुवारी व २० फेब्रुवारी २०२६ रोजी ‘वर्किंग डिनर’ आयोजित करण्यात येणार आहे.​

तसेच १९ व २० फेब्रुवारी २०२६ रोजी कार्डिफमधील वेल्स सरकारची संसद , वेस्टमिन्स्टर पॅलेस या यूके संसदेच्या (हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स) ऐतिहासिक ठिकाणी तसेच ‘बिग पिट’ आणि ‘सेंटर फॉर अल्टरनेटिव्ह टेक्नॉलॉजी’ यांसारख्या प्रमुख ठिकाणांना भेटी दिल्या जाणार आहेत अशी माहिती आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या वसई येथील जनसंपर्क कार्यलयातून देण्यात आली आहे.

एकूणच काय तर लंडन येथील यशस्वी मॉडेल्सचा अभ्यास करून महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन उभारण्याचा एक महत्वाकांक्षी निर्धार या दौऱ्याच्या निमित्ताने आखला असल्याचे आमदारांनीं सांगितलं.

Loading

आशिष राणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!