चौकट राज्यावर आधी पडल्या धाडी नंतर 7 दिवसाची ईडी कोठडी व आता 14 दिवसांची मिळाली ज्यूडिशियल कस्टडी..!
वसई विरार महापालिकेत कार्यरत असताना वसई विरार मध्ये डंपिग ग्राऊंडसाठी राखीव असलेल्या जागेवर 41 अनधिकृत बांधकामात व अन्य विविध कामामध्ये केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचारा प्रकरणी अटकेत असलेल्या माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या सहित अन्य तिघांना पीएमएलए कोर्टाने आता 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे.

वसई :- आशिष राणे
वसई विरारमध्ये डंपिग ग्राऊंडसाठी राखीव असलेल्या जागेवर 41अनधिकृत बांधकामे व त्यासबंधी भ्रष्टाचार केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या माजी आयुक्त अनिल कुमार यांच्या सहित वाय. एस.रेड्डी, गुप्ता पिता पुत्र अशा चौघाना बुधवार दि. 20 ऑगस्ट रोजी मुंबईतील पीएमएलए कोर्टाने आतापुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अनिलकुमार पवार यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पवार यांच्यासह इतर तिघांना देखील तितक्याच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह नगर रचना विभागाचे निलंबित उपसंचालक वाय एस रेड्डी, तसेच बांधकाम व्यावसायिक सिताराम गुप्ता आणि अरूण गुप्ता या चौघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे या चौघांना आता 3 सप्टेंबर पर्यंत कोठडीतचं रहावे लागणार आहे.
आधी 7 आता 14 दिवसांचा मुक्काम !
याआधी दि.14 ऑगस्ट रोजी पीएमएलए कोर्टात या चौघांना 7 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली होती.त्याची मुदत दि 20 ऑगस्ट रोजी संपली त्यानुसार या चौकडीला ईडीने आज बुधवारी दुपारी कोर्टात हजर केलं त्यानंतर आता पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ईडीला छापेमारीत मिळालं होतं घबाड ?

वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर 41 अनधिकृत इमारती व अन्य प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत त्यांना बुधवार दि.13 ऑगस्ट रोजी रात्री ईडीने अटक केली होती. पवार यांच्यासह ईडीने वसई विरार महापालिकेतील नगररचनाकार वाय एस रेड्डी,
सिताराम गुप्ता आणि पुत्र अरुण गुप्ता यांनाही अटक केली होती.
आपल्या प्रशासकीय पदाचा जाणीवपूर्वक दुरुपयोग…!

अनिलकुमार पवार यांच्यावर वसई विरार परिसरात मलनिस्सारण आणि डंपिंग ग्राउंडसाठी राखीव 60 एकर भूखंडावर बांधण्यात आलेल्या 41 अनधिकृत इमारतीत मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात माजी नगरसेवक सीताराम गुप्ता यांच्यावर सूत्रधार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.आणि अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने करोडोंचा भ्रष्टाचार केल्याची देखील ईडी ला माहिती आहे

रेड्डीच्या नालासोपारा व हैद्राबाद निवासस्थानी पडल्या धाडी : 33 कोटीचे सापडलं घबाड

या प्रकरणातील यापूर्वीच्या छाप्यात ईडीने 13,आणि 14 मे 2025 रोजी रेड्डी यांच्या नालासोपारा व हैद्राबाद येथील घरातून 8 कोटी 94 लाख रोख,23 कोटी 25 लाखाचे हिरे,13 कोटी 86 लाखाचे शेअर्स अणि गुंतवणूक असलेली मालमत्ता जप्त केल्या होत्या.

माजी आयुक्त पवारांचा हीं पाय खोलात : रोकड, डिजिटल पुरावे, हार्डडिस्क… बेनामी दस्त,

तर दि. 29 जुलै 2025 रोजी माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या वसई, मुंबई, पुणे आणि नाशिक,सह 12 ठिकाणी धाडी घातल्या होत्या, तसेच सटाणा येथील गावच्या पुतण्याच्या घरी 1 कोटी 33 लाखाची रोकड जप्त केली.

ईडीच्या रडारवर बिल्डर, आर्किटेक, अभियंते, ठेकेदार सहित बरेच कलाकार..राजकीय व्यक्ती देखील..?
या प्रकरणात लेखापाल,वास्तुविशारद,कनिष्ठ अभियंते,ठेकेदार,राजकीय व्यक्ती आदी बडे अधिकारी आणि अनेक एजंट आतापर्यंत ईडीच्या रडारवर आहेत आणि तसा कसून तपास हीं ईडी कडून अदयापही सुरु असल्याचे सूत्रांच्या माध्यमातून कळते आहे त्यामुळे पुढील काळात वरील पैकी कुणालाही ताब्यात किंवा अटक झाल्यास काही नवल वाटण्यासारखे नाही.हे आता वसई करांच्या पूर्णपणे लक्षात आले आहे.
![]()
